टोल चुकविण्यासाठी अधिकारांचा गैरवापर

मोहसिन संदे
दिवसाकाठी 200 वाहने चुकवितात कर; वाहनधारक व कर्मचाऱ्यांमध्ये रोजच होते वादावादी

कोपर्डे हवेली  – टोलनाक्‍यावर घेतली जाणारी टोलची रक्कम अधिकृत असते. पण ती चुकविण्यासाठी बनावट शासकीय बोर्ड लावण्याचा फंडा वाढला आहे. तसेच पदाधिकारी असल्याचा दबाव वापरण्यात येतो. परिणामी टोलनाक्‍यावरील कर्मचारी व वाहनधारकांत शाब्दिक चकमकी उडत आहेत.
टोलनाक्‍यावर येताच शासकिय उल्लेख असणारे फलक, पोलीस टोपी, अंबर दिवे काचेच्या मागे ठेवण्यात येतात. पोलीस, महाराष्ट्र शासन, भारत सरकार असे रेडिअमचे फलक सर्रास दिसून येतात.

अशा वाहनात असणाऱ्या व्यक्ती शासकिय कर्मचारी अथवा अधिकारी असतात. कित्येकदा अशा व्यक्तींनी आपल्या नातेवाईक, मित्रांना आपली ओळखपत्रे दिलेली असतात. काही वेळा कागदपत्रे बनावट असल्याचे दिसून येते. अधिक चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे व वादाचे प्रसंग उभे राहतात. मग राजकीय व्यक्तींना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधणे, स्थानिक तरूणांना बोलावून दमदाटी करणे असे प्रकार घडतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो, तसेच धक्काबुक्कीसारखे गैरप्रकार घडतात.

टोलनाका प्रशासन अशा कृत्यांना कंटाळले आहे. प्रत्येक विभागाने असे गैरकृत्य करणाऱ्यांना आळा बसण्यासाठी सूचनावजा परिपत्रक काढले पाहिजे, असे टोलनाका प्रशासनाचे ठाम मत आहे. दिवसभरात सुमारे 200 वाहने टोल चुकवित असल्याने अप्रत्यक्ष शासकीय भरण्यातच तूट येत असते. आजपर्यंत टोलनाका प्रशासनाने पाचशेपेक्षा जास्त बनावट ओळखपत्रे व तीन अंबर दिवे जप्त केले आहेत. वेगात वाहने नेल्याने अपघाताची शक्‍यता असते. टोलनाक्‍यावरील कर्मचारी अशा घटनांना बळी पडतात.

बनावट कागदपत्रे दाखवणे व कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्याचे प्रमाण वाढले आहे. लाख-लाख रूपयांच्या गाड्या वापरताना पंचाहत्तर, शंभर रूपयांसाठी वाद आणि हुज्जत घालतात. टोल प्रशासनाने जप्त केलेली बनावट ओळखपत्रे ज्या त्या खातेप्रमुखांकडे सादर करणार आहोत. यात सर्वात जास्त प्रमाण पोलीस खात्याचे आहे.
रमेश शर्मा ,व्यवस्थापक, तासवडे टोलनाका

Leave A Reply

Your email address will not be published.