पुणे – महाविद्यालयात एकत्र असताना जुळलेल्या प्रेमसंबधातून अत्याचार झाले. यातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. याचदरम्यान ती गोव्याला नातेवाईकांकडे गेली. तिने तेथील स्थानिक मापुसा पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हा सर्व प्रकार हडपसर हद्दीतील असल्याने ही फिर्याद झीरो नंबरने हडपसर पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आली आहे.
याप्रकरणी कुणाल पटेल (रा. फातिमानगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 17 वर्षांची असून तिचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते. यातून त्याने फेब्रुवारी 2019 मध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यामुळे पीडित गर्भवती राहिली होती.
तिचे नातेवाईक गोव्याला असल्याने ती गोव्याला गेल्यानंतर तिला ती गर्भवती राहिल्याचे समजले. तिला वेगवेगळ्या पद्धतीने गर्भपात करण्यासंबधी सांगण्यात आले. परंतु, तिने गर्भपातास नकार देऊन ती बाळाला जन्म देऊन सांभाळण्याच्या वक्तव्यावर कायम राहिली.
याचदरम्यान ती गोव्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. तेथे तिच्यावरील अत्याचाराच्या अनुषंगाने मापुसा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. दरम्यान, जन्मलेले बाळ आता एक वर्षाचे झाले आहे, असे हडपसरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले.