मुंबई – सध्या लग्नानंतर काही दिवसामध्येच पती-पत्नीमध्ये भांडण होणे, मतभेद होणे आणि नंतर ही प्रकरणे कोर्टात जाणे हे आजच्या काळात अगदी सामान्य झाले आहे. त्यामुळे भारतामध्ये घटस्फोटाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
लग्नानंतर फार कमी कालावधीनंतर घटस्फोटाची परिस्थिती निर्माण झाल्याचे भारतात अनेक प्रकरणांमध्ये दिसून येत आहे. तसेच या घटस्फोट घेण्यामागे अनेक कारणे देखील आहेत. त्यातच संबंधित प्रकरणे कोर्टात गेल्यानंतर त्यावर कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार कारवाई केली जाते. मात्र काही वेळेस कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा दुरुपयोग केला जातो, असे गंभीर निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.
कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत पत्नीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार करणे आम्ही समजू शकतो. मात्र यामध्ये सासू-सासऱ्यांच्या विरोधातही कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली जाते. आजाराने अंथरुळाला खिळलेल्या या वयस्कर लोकांना यामध्ये अडकवले जाते. त्यांच्याविरोधात देखील खटला चालतो. अशा गोष्टींचे आम्ही समर्थन करणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट नमूद केले आहे.
तसेच आम्हाला पीडित महिलांबाबत सहानुभूती आहे. पण या कायद्याचा चुकीचा वापर करत कुटुंबातील सदस्यांना नाहक त्रास दिला जातो, असे गंभीर निरीक्षण उच्च न्यायालयाने केले आहे. न्यायमुर्ती अजय गडकरी आणि न्यायमुर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली आहे. यावेळी अशा गोष्टींचे आम्ही समर्थन करणार नाही, असे खंडपीठाने नमूद केले आहे.