गैरहजर विद्यार्थ्यांना पास करणार नाही; पिंपरी-चिंचवडमधील शाळेचा पवित्रा

इंडीपेन्डन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनचा पवित्रा : दहा ते पंधरा टक्‍के विद्यार्थी होते गैरहजर

पिंपरी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अचानक पहिली ते आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, प्रत्येक शाळेमध्ये 10 ते 15 टक्के विद्यार्थी असे आहेत जे संपूर्ण वर्षभर गैरहजर आहेत. अशा विद्यार्थ्याना पास न करण्याचा निर्णय इंडीपेन्डट इंग्लिश स्कूल असोसिएशने घेतला आहे.

याबाबत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र दायमा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाळांची ऑनलाइन परीक्षांची तयारी होत असताना असा निर्णय घेणे दुदैवी आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे सलग दुसऱ्या वर्षी मूल्यमापन होणार नाही. भविष्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे.

जे विद्यार्थी वर्षभर गैरहजर राहिले, ज्यांनी ऑनलाइन किंवा ऑफलाइन असा कोणतेच शिक्षण घेतले नाही, अशा विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क न आकारता त्यांना त्याच वर्गात बसविले जाईल. अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पास करणे म्हणजे त्यांचे शैक्षणिक नुकसान करण्यासारखे आहे. तसेच पालकांनी देखील स्वच्छेने यावर्षी मुलांना त्याच वर्गात बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तशी विनंती शाळेच्या प्रशासनाकडे केली जात आहे. त्यांना पर्याय उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी, ईसा संघटनेची आहे.

पुन्हा त्याच वर्गात शिक्षण
करोनामुळे या शैक्षणिक वर्षातील बहुतेक काळ ऑनलाइन शिक्षणातच गेला. शहरात असे अनेक विद्यार्थी आहेत, ज्यांच्याकडे मोबाइल व इंटरनेटसारख्या सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. अनेक पालकांनी आपल्या मुलांचे भविष्य चांगले व्हावे, यासाठी पोटाला चिमटा काढून मुलांना इंग्लिश माध्यमांच्या शाळांमध्ये घातले होते. परंतु करोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, लहान-मोठे व्यवसाय ठप्प झाले. पर्यायाने ऑनलाइन शिक्षणाचा आर्थिक भारही काही पालकांना वहन करता आला नाही. अशा परिस्थितीमुळे काही विद्यार्थ्यांची इच्छा असूनही शैक्षणिक वाटचाल ठप्प झाली. अशा विद्यार्थ्यांची मागील वर्षाची फी न घेता त्यांना पुन्हा त्याच वर्गात शिक्षण देण्याची तयारी इंडीपेन्डट इंग्लिश स्कूल असोसएशिनच्या वतीने दर्शविण्यात आली आहे.

प्रत्येक शाळेत असे 15 ते 20 टक्‍के विद्यार्थी आहेत, जे वर्षभर संपर्कातच नाहीत. त्यांनी ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षणच घेतले नाही. अशा विद्यार्थ्यांना पास करणे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्यासारखे आहे. अशा विद्यार्थ्यांकडून आम्ही शुल्क घेणार नाही. त्यांना त्याच वर्गात शिक्षण दिले जाईल.
– राजेंद्र दायमा, प्रदेशाध्यक्ष, इंडीपेन्डट इंग्लिश स्कूल असोसएशिन

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.