पुणे – अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयातील अधिकारी, कर्मचारी विनापरवानगी गैरहजार राहत आहेत. काहीजण वेळेवर कार्यालयात येत नाहीत. तर, उपस्थिती लावून गायब होतात. अशांना शिस्त लावण्यासाठी शिक्षण उपसंचालकांनीच पुढाकार घेतला आहे. विनापरवानगी गैरहजर राहिल्यास संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्या दिवसाचे वेतनच देण्यात येणार नाही.
गेल्या एक-दीड वर्षापासून अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाच्या कामकाजाची घडी विस्कटली आहे. कार्यालय कधी उघडतात अन् कधी बंद करतात हेच अनेकदा समजत नव्हते. या कार्यालयाचे संचालक सुनिल चौहान हे 28 फेब्रुवारीला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्याकडे कार्यालयाच्या संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला.
गेल्या डिसेंबरमध्ये पदोन्नतीने राजेश क्षीरसागर यांची उपसंचालकपदी नियुक्ती झाली. क्षीरसागर यांनी कार्यालयाच्या कामकाजाला दिशा देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न सुरू ठेवले. अधिकारी, कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थितीचे बंधन घातले आहे. याबाबत सूचना देऊन काहीजण विनापरवानगी गैरहजर राहत आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे गैरहजर राहिलेल्या दिवसाचे वेतनच आता अदा केले जाणार नाही, असे आदेश उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी काढले आहेत.
कार्यालय सकाळी वेळेवर कधीच उघडले जात नाही. बऱ्याचदा दुपारी 4 नंतर कार्यालयातून अधिकारी, कर्मचारी गायब होत असल्याचे आढळले आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची कामे अद्यापही मार्गी लागलेली नाहीत. संबंधीत कर्मचारी सतत हेलपाटे मारत असतात.