- एकाही लोकप्रतिनिधीकडे जबाबदारी नाही; आयुक्तांकडून दिला जातोय आढावा
पिंपरी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या बैठकांना पिंपरी-चिंचवडच्या महापौरांची सातत्याने सुरू असलेली अनुपस्थिती हा चर्चेचा विषय बनला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महापौर त्यांचा प्रतिनिधीही या बैठकीला पाठवित नसल्यामुळे शहरातील कोविड परिस्थितीचा आढावा केवळ आयुक्त श्रावण हर्डीकर हेच देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोविड परिस्थितीतील त्रुटींचे निराकरणच होत नसल्याचा आरोप होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही महापालिकांचे आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व दोन्ही महापालिकांच्या महापौरांच्या उपस्थितीमध्ये दर शुक्रवारी पुण्यात आढावा बैठकीचे आयोजन केले जाते. या बैठकीला पिंपरी-चिंचवडच्या महापौर या वारंवार अनुपस्थित राहत असल्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने कोविडचा आढावा उपमुख्यमंत्र्यांकडे सादरच होत नाही.
आयुक्त श्रावण हर्डीकर हे केवळ चांगल्याच बाबी सादर करत असल्यामुळे कोविडच्या परिस्थितीमधील त्रुटी दूर होण्यात अनेक अडथळे येत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वसामान्य नागरिक हे थेट लोकप्रतिनिधी अथवा पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असतात. त्यांच्या नेमक्या अडचणी या लोकप्रतिनिधींना माहिती असतात. आयुक्त हे केवळ प्रशासकीय प्रमुख असल्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणींपासून ते दूर असतात.
पुण्यात होणाऱ्या आढावा बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेचे प्रश्नच मांडले जात नसल्याचे वास्तव समोर आले आहे. महापौरांना इतर कार्यक्रम असतील तर त्यांनी आपला प्रतिनिधी या नात्याने उपमहापौर, पक्षनेता, स्थायी समिती अध्यक्ष यापैकी कोणालातरी पाठविणे अपेक्षित असताना असे होताना दिसून येत नाही. त्यामुळे महापौरांनी स्वत: अथवा आपला प्रतिनिधी उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पाठवावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.
बैठकांचे महत्त्व अधोरेखित
शुक्रवारी वरिष्ठांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीचे महत्त्व यापूर्वी अनेकदा अधोरेखित झाले आहे. या बैठकांमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वसामान्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतले गेले आहेत. पुण्यात मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले गेले असले तरी पिंपरी-चिंचवडच्या बाबतीत मात्र तसे झालेले नाही. प्रश्नच पोहोचत नसल्याने निर्णयच घेतले जात नसल्याचे सांगण्यात येत आहे.