नवी दिल्ली – बिहारमधील निवडणूक काळात लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख खासदार चिराग पासवान आणि भाजपमध्ये जरा तणावाचेच वातावरण निर्माण झालेले दिसले; परंतु आज झालेल्या एनडीच्या बैठकीला चिराग पासवान यांनी भाजपकडून अधिकृतपणे निमंत्रण देण्यात आले होते. तथापि हे निमंत्रण मिळाल्यानंतरही पासवान यांनी प्रकृती बरी नसल्याचे कारण देत बैठकीला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. आपण सरकारने बोलावलेल्या सर्व पक्षीय बैठकीलाही उपस्थित राहणार नाही, असेही पासवान यांनी नमूद केले आहे.
बिहार निवडणुकीत लोकजनशक्ती पक्ष हा एनडीए आघाडीत समाविष्ट नव्हता. त्यांनी स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवली होती. त्यांना तेथे एकच जागा जिंकता आली; पण त्यांनी संयुक्त जनता दलाचे संख्याबळ मात्र कमी करण्यात मोठा हातभार लावला आहे.
लोकजनशक्ती पक्षामुळेच नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनतादलाचे संख्याबळ 71 वरून 43 इतके खाली आले होते. त्यामुळे नितीशकुमार यांनी या पक्षाच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे लोकजनशक्ती पक्षाच्या नेत्यांना एनडीएच्या बैठकीला बोलावले जाईल की नाही या विषयी शंका व्यक्त केली जात होती. पण त्यांचा पक्ष हा एनडीए आघाडीचा घटक पक्ष असल्याचे नमूद करून संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांनाही या बैठकीला निमंत्रण पाठवण्यात आल्याचे नमूद केले.