कोल्हापूर – राजस्थानमधून 15 ते 16 महिन्यांपासून फरार असलेला कुख्यात गुंड पपला गुर्जर याला अखेर कोल्हापुरात जेरबंद करण्यात यश आले आहे. राजस्थान पोलिसांनी मोठ्या शिताफीने पपला गुर्जर याला अटक केली असून कोल्हापूर पोलिसांची या कारवाईमध्ये मठी मदत झाली आहे.
कोल्हापुरातल्या सरनोबतवाडी येथील उजळाई कॉलनीमध्ये पपला गुर्जर 10 महिन्यांपासून राहत होता. संपूर्ण भारतातील पोलीस ज्याच्या शोधात होते. त्या पपलाला राजस्थान पोलिसांनी सरनोबतवाडीमधून मध्यरात्री अटक केली. पपलासोबत त्याच्या मैत्रीणीलासुद्धा पोलिसांना अटक केली आहे. जिया शिकालगार असे या तरुणीचे नाव असून ती सातारा जिल्ह्यातील असल्याचेही समोर आले आहे.
एका जिममध्ये जिया आणि पपला याची ओळख झाल्याची माहिती मिळाली असून गेल्या महिनाभरापासून जिया कोल्हापूरात येत होती, अशी माहिती सुद्धा सारनोबतवाडी येथील स्थानिक नागरिकांकडून मिळाली.पपला हा कोल्हापूरात आश्रय घेऊन असल्याबाबतची राजस्थान पोलिसांना माहिती मिळाली.
यावेळी पपला ज्या सरनोबतवाडी येथील उजळाई कॉलनीमध्ये राहायला होता. त्याठिकाणी पोलिसांनी सापळा रचला. शिवाय हा संपूर्ण परिसर पोलिसांनी चारही बाजूंनी घेरला होता. यामध्ये ईआरटी कमांडो यांची सुद्धा मदत घेण्यात आली होती. त्यानुसार मध्यरात्री ही कारवाई करून पपला गुर्जर आणि तिची मैत्रीण जिया शिकालगारला अटक करण्यात आली, अशी माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.