नवी दिल्ली – करोनाच्या महासंकटामुळे जगाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली असली तरी
परदेशात नोकरी-व्यवसाय करणाऱ्या भारतीयांनी कष्ट करून कमावलेल्या रकमेपैकी जगात
सर्वाधिक म्हणजे 83 अब्ज डॉलर (सुमारे 6.09 लाख कोटी रुपये) एवढी रक्कम भारतात
पाठवलेली आहे.
सलग 14 व्या वर्षी परदेशातील भारतीयांनी याबाबत जगातील आपला नावलौकिक कायम
ठेवलेला आहे. गेले वर्षभर करोनाच्या साथीने जगभर थैमान घातले असले तरी परदेशी
भारतीयांकडून येणारा पैशांचा ओघ कायम आहे.
सध्याची प्रतिकूल परिस्थिती पाहता गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यामध्ये किंचित मध्ये 0.2 टक्क्यांची घट झाली आहे. जागतिक बँकेने एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. स्थलांतरितांच्या चष्म्यातून कोविड-19 संकटाचा सामना असे या अहवालाचे नाव आहे.
परदेशातील भारतीयांकडून भारतात पाठवल्या जाणाऱ्या रकमेत घट दिसत आहे ती संयुक्त
अरब अमिरातीमधून येणाऱ्या पैशातील घट आहे. त्या देशातील भारतीय देशात पाठवत
असलेल्या एकूण रकमेत गेल्या वर्षभरात 17 टक्क्यांनी घट झालेली आहे.
त्यामागे कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने मध्य आशियातील तेलावर अवलंबून असणाऱ्या अनेक देशांना फटका बसला. त्यामध्ये संयुक्त अरब अमिरातीचाही समावेश आहे. तेथील अनेक कंपन्यांनी कामगार कपात केली. त्यामुळे भारतात पैसा पाठवणाऱ्या अनेकांना परत मायदेशी यावे लागले.
गल्फ कोऑपरेशन कौन्सिलच्या (जीसीसी) सदस्य देशांमधे काम करणारे सुमारे 12 लाख
स्थलांतरीत कामगार केरळमध्ये परत आले आहेत. या सर्व देशांमध्ये केरळमधील सुमारे 40
लाख लोक काम करतात. राज्याच्या प्राप्तीमध्ये त्यांनी पाठवलेल्या पैशाचा हिस्सा तब्बल 30
टक्के एवढा आहे.
संयुक्त अरब अमिरातीमधून येणाऱ्या पैशाचा ओघ मोठ्या प्रमाणावर कमी झाला असला तरी
त्यामुळे देशात येणाऱ्या एकून रकमेवर फारसा फरक पडलेला नाही. कारण अमेरिकेतील
भारतीयांकडून मायदेशात पाठवल्या जाणारी रक्कम मोठी आहे.
अमेरिकेत जगभरातून स्थलांतरीत नोकरी-व्यवसायाच्या शोधात येतात. त्यामुळे अमेरिकेतून हे
स्थलांतरीत दरवर्षी आपआपल्या देशांमध्ये तब्बल 68 अब्ज डॉलर एवढी रक्कम पाठवतात.
त्याचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेत सुमारे पाच कोटी साठ लाख स्थलांतरीत अधिकृतपणे
नोकरी-व्यवसाय करतात.
अन्य देशांमधून कष्टाचा पैसा कोणत्या देशांमध्ये सर्वाधिक पाठवला जातो?
क्रमांक देश वर्षभरात परदेशातून येणारी रक्कम (अब्ज डॉलर)
- भारत 83
- चीन 60
- मेक्सिको 43
- फिलिपाईन्स 35
- इजिप्त 30
कोणत्या देशांमधून सर्वाधिक रक्कम स्थलांतरीत मूळ देशात पाठवतात?
क्रमांक देश बाहेरच्या देशात पाठवली जाणारी
रक्कम (अब्ज डॉलरमध्ये)
- अमेरिका 68
- संयुक्त अरब अमिराती 43
- सौदी अरेबिया 35
- रशिया 17