जीवनसत्त्वांविषयी: जीवनसत्त्वांचं महत्त्व अधोरेखित

विविध संशोधनांद्वारे सातत्यानं आहारातील जीवनसत्त्वांचं महत्त्व अधोरेखित होत राहिलं आहे. जीवनसत्त्वांच्या अभावामुळे किंवा अतिरेकामुळे अनेक प्राणघातक आजार होतात. म्हणूनच व्यायामाबरोबरच शक्‍य तितका चौरस आहार हे निरोगी जीवनाचं सूत्र आहे. आहारात कोणत्या जीवनसत्त्वाचा किती समावेश असला पाहिजे याबाबत अलीकडे बरेच निष्कर्ष काढले गेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही त्यांचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. 

विविध जीवनसत्त्वांचं महत्त्व अलीकडच्या अनेक संशोधनांमधूनही दिसून येत आहे, त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे या जीवनसत्त्वांशी अनेक गंभीर आजार निगडीत असल्याचं अलीकडे स्पष्ट होत चाललं आहे. पूर्वापार ज्ञात असलेल्या अ, ब, क, ड या जीवनसत्त्वांबरोबरच ई आणि के या जीवनसत्त्वांनाही महत्त्व देण्याची गरज दाखवून देणारं संशोधनही अलीकडे पुढे येत आहे. अ जीवनसत्त्वाची कमतरता अनेक चिंता करण्याजोगे दुष्परिणाम करते. जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगभरातल्या बालवाडीमधल्या सुमारे 25 कोटींहून अधिक मुलांमध्ये अ जीवनसत्त्वाची कमतरता आहे. तसंच दर वर्षी या कमतरतेमुळे सुमारे अडीच ते पाच लाख मुलं अंध बनतात आणि त्यांच्यापैकी सुमारे निम्मी मुलं अंधत्व आल्यापासून वर्ष-दोन वर्षांमध्ये मरण पावतात. अ जीवनसत्त्वाची कमतरता हे जगभरातल्या मुलांमधल्या अंधत्वाचं प्रमुख कारण आहे. तसंच या कमतरतेमुळे गंभीर जंतुसंसर्गानं मृत्यू होण्याचा धोकाही वाढतो. गर्भवतींमध्ये रातांधळेपणा निर्माण होतो आणि त्याबरोबरच प्रसूतीदरम्यान मृत्यू होण्याचा धोकाही वाढतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार अ जीवनसत्त्वाची कमतरता ही जगातल्या निम्म्याहून अधिक देशांमधली गंभीर समस्या आहे. त्यातही आफ्रिका आणि आग्नेय आशियात कमी उत्पन्न गटातल्या लहान मुलांमध्ये आणि गर्भवतींमध्ये ती मोठ्या प्रमाणात आढळते. मुलांमध्ये अंधत्वाखेरीज, मृत्यूचा, विविध प्रकारच्या जंतुसंसर्गांचा आणि हगवणीचा धोका मोठा असतो. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं मातांना अर्भकांना स्तनपान देण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर स्तनपान मिळालेल्या मुलांमध्ये या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण 23 टक्के आणि कांजण्यांचा त्रास होण्याचं प्रमाण 50 टक्के कमी असल्याचं दिसून आलं आहे. या दृष्टीनं 1998 पासून युनिसेफच्या साहाय्यानं जागतिक आरोग्य संघटनेने आहारातून व्हिटॅमिन ए घेण्याविषयी जागृती करण्याचा कार्यक्रम राबवण्यासही सुरुवात केली आहे.

जगभरात अनेक गरीब भागांमध्ये बी 12 जीवनसत्त्वाचा अभाव आढळत असला तरी भारतातल्या लोकांमध्ये तो विशेषत्वानं आढळतो. या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे मधुमेहाची तीव्रता वाढत असल्याचं नवी दिल्लीतल्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. हे संशोधन इंडियन जर्नल ऑफ एंडोक्रायनॉलॉजी अँड मेटॅबॉलिझमच्या अंकात प्रसिद्ध झालं आहे. या संशोधकांनी काढलेल्या निष्कर्षानुसार भारतात एकट्या उत्तर भारतातच 47 टक्के लोकांमध्ये बी 12 ची कमतरता होती. तसंच मधुमेहाची तीव्रता जास्त असणाऱ्या व्यक्तींमध्ये बी 12 ची कमतरताही अधिक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

याविषयी जगभरात अनेक ठिकाणी संशोधन होत असून मधुमेहाला प्रामुख्यानं या जीवनसत्त्वांसह इतर जीवनसत्त्वांचा अभाव कारणीभूत असल्याचं दिसून येत आहे. दूध, दुग्धजन्य पदार्थ, लाल मांस यामध्ये हे जीवनसत्त्व प्रामुख्यानं आढळतं. बी 12 ची कमतरता म्हणजे रक्तक्षय किंवा ऍनिमिया असं समीकरणही मांडलं जातं. याशिवाय मेंदूच्या सर्वसामान्य कार्यासाठी, निरोगी रक्तासाठी आणि थायरॉईडच्याही सुरळीत कार्यासाठी ते आवश्‍यक असतं. तसंच ते हृदयविकारही रोखतं. विस्मरण, नैराश्‍य, पार्किन्सन्स यांच्या मुळाशीही या जीवनसत्त्वाचा अभाव असल्याचं आता अलीकडच्या संशोधनांतून दिसून आलं आहे. मात्र आजार जडण्याआधीच ही कमतरता भरून काढली पाहिजे. केस गळणं, हाता-पायाला मुंग्या येणं अशी लक्षणही बी 12 च्या अभावामुळे दिसतात.

क जीवनसत्त्वाची कमतरता हा सर्दीपासून अनेक आजारांना आमंत्रण देणारा घटक ठरतो. शिवाय ई जीवनसत्त्वाची पुनर्निर्मिती करण्यासाठीही हे जीवनसत्त्व उपयुक्त ठरतं. बहुतांश सस्तन आणि इतर प्राण्यांप्रमाणे क जीवनसत्त्वाची निर्मिती मानवी शरीरात केली जात नाही. ते आहारातूनच मिळवावं लागतं. शरीरातल्या अनेक एन्झायम्सच्या कार्यासाठी क जीवनसत्त्व अत्यावश्‍यक असतं. टोकिओतल्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की, उच्च रक्तदाबाचा आणि कोरोनरी हृदयविकाराचा तसंच अर्धांगवायूचा धोका कमी करण्यात या जीवनसत्त्वाचा मोठा वाटा असतो. कर्करोग आणि जीवनसत्त्वाचा अभाव यांचा परस्परसंबंध असल्याचं दाखवणारी अनेक संशोधनं आजतागायत प्रसिद्ध झाली आहेत.

क जीवनसत्त्व लिंबू आणि लिंबूवर्गातल्या मोसंबी, संत्री इत्यादी फळांमध्ये आढळत असलं तरी कोणत्या फळातलं क जीवनसत्त्व अधिक प्रमाणात शरीरात शोषलं जातं यावर पुरेसं संशोधन झालेलं नाही. मात्र ते अतिरिक्त प्रमाणात शरीरात गेलं तर लघवीतल्या ऑक्‍झलेटचं प्रमाण वाढतं. त्यामुळे मूतखड्यांचा त्रास होतो का याविषयीही पुरेसं संशोधन झालेलं नाही. त्यामुळे कोणत्याही आहाराचा अतिरेक केला जाऊ नये आणि तो पूर्ण वर्ज्यही करू नये हे तत्त्व सर्वच जीवनसत्त्वांच्या बाबतीत लागू पडतं.

ड जीवनसत्त्वाला सूर्यप्रकाशातलं व्हिटॅमिन असं सार्थपणे म्हटलं जातं. कारण सूर्यप्रकाशात त्वचा ते तयार करते. ड 2 ए आणि ड 3 ए असे या जीवनसत्त्वाचे दोन उपप्रकार असतात आणि त्यांना अनुक्रमे अर्गोकॅल्सिफेरॉल आणि कोलेकॅल्सिफेरॉल असं म्हटलं जातं. सूर्यप्रकाशातले अतिनील बी किरण व्हिटॅमिन डी 3 ए त्वचेखाली तयार करतात. सूर्यप्रकाशाबरोबरच आहारातूनही हे व्हिटॅमिन मिळू शकतं. मासे, लाल मांस, अंड्यातला बलक आणि यकृत यांमध्ये ज्ञडक्ष जीवनसत्त्व असतं. मशरूम्समधूनही ते मिळू शकतं. मात्र अलीकडच्या काळात लोकांचं सूर्यप्रकाशात जाणं बरंचसं कमी झालं असून चौरस आहार नसेल तर पुरेशा प्रमाणात ज्ञडक्ष जीवनसत्त्व मिळणं कठीण झालं आहे. विशेषतः शाकाहारी व्यक्तींना ते कमी प्रमाणात मिळतं. त्यामुळे शरीरातलं कॅल्शियम आणि फॉस्फेट यांचं प्रमाण बदलतं. कारण व्हिटॅमिन डी त्यांच्या प्रमाणाचं नियमन करतं. साहजिकच या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी निर्माण होतात, एवढंच नव्हे, तर त्यामुळे मृत्यूही संभवतो.

काही अभ्यासांमधून असं दिसून आलं आहे की, या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे मृत्यू होत असल्याविषयी वैद्यकीय जगतात मोठ्या प्रमाणात जागृती नाही. युरोपियन असोसिएशनच्या वार्षिक अधिवेशनात मधुमेहावरचं संशोधन सादर करण्यात आलं. ऑस्ट्रियाच्या मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएन्ना इथल्या संशोधकांनी केलेल्या या संशोधनातून स्पष्ट झालं आहे की रक्तातल्या ड जीवनसत्त्वाचं प्रमाण कमी झालं तर शरीरातलं मृत्यू होऊ शकतो. या संशोधनात सर्व वयोगटांमधल्या 78,581 व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता आणि त्यांना ड जीवनसत्त्वाचा अत्यल्प पुरवठा करण्यात आला. त्यांचं सरासरी वय 51 होतं आणि त्यांच्यामध्ये 31.5 टक्के पुरुष होते.45 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींवर या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे जीवघेणा परिणाम होत असल्याचा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला.

कर्करोग आणि हृदयविकार यामुळे होणाऱ्या मृत्यूंखालोखाल ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या असल्याचंही या संशोधकांचं म्हणणं आहे. कारण ही कमतरता अनेक आजारांची तीव्रता वाढवते. त्यामुळे प्रत्यक्ष कमतरतेमुळे नव्हे, आजारांमुळे मृत्यू होत असल्याचा सरसकट निष्कर्ष काढला जातो. मधुमेहामुळे मृत्यू होण्याच्या जोखमीत ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे 4.4 पटींनी वाढ होत असल्याचं या आणि इतरही काही संशोधनांमधून स्पष्ट झालं आहे, ही बाब या निष्कर्षाला दुजोरा देणारी आहे. 

ई जीवनसत्त्वाचा अभाव क्वचित आढळतो. जन्मतः वजन खूप कमी असेल तर हा अभाव आढळतो. मात्र हे जीवनसत्त्वही आवश्‍यक असतं. कारण त्याच्या कमतरतेचाही संबंध हृदयविकारासारख्या गंभीर आजारांशी असल्याचं आढळलं आहे. ही जीवनसत्त्वं मिळवण्यासाठी गोळ्या, इंजेक्‍शनचाही वापर केला जातो.

परंतु प्रत्येक मोसमात मिळणाऱ्या पालेभाज्या, कडधान्यं, कंद आणि इतर भाज्या आणि फळं, सालीसकट धान्यांची पीठं, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि मांसाहारी असाल तर मासे व मांस यांचा आहारात योग्य प्रमाणात समावेश असला पाहिजे, हे सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे कमतरता नैसर्गिकरित्या दूर होऊन अनेक आजारांपासून दूर राहता येईल असा याचा सर्वसामान्य निष्कर्ष आहे.

– डॉ. शितल जोशी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.