अबाऊट टर्न : विक्रम

हिमांशू

“प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ असं म्हणत आपण कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुकाबला करत असतानाच “तेलही गेलं आणि तूपही गेलं…’ म्हणायची वेळ आलीय. किटाणूंना 99.9 टक्‍के मारणाऱ्या घरगुती जंतुनाशकांच्या, साबणांच्या आणि इम्युनिटी वाढवणाऱ्या औषधी, च्यवनप्राश आदींच्या जाहिराती धुमाकूळ घालत असतानाच तिकडे मैदानावर एका खेळाडूने सेंच्युरी ठोकली तर दुसऱ्याने डबल सेंच्युरी! जवळजवळ दोन महिन्यांनंतर उघडलेल्या दुकानांत जाताना आनंद होण्याऐवजी भीती वाटू लागली तर तो “अनलॉक’ काय कामाचा?

एकाच वर्षात शेंगतेल 20 टक्‍क्‍यांनी, तिळाचं तेल 44 टक्‍क्‍यांनी, सोयाबीन तेल 53 टक्‍क्‍यांनी, सूर्यफूल तेल 56 टक्‍क्‍यांनी, वनस्पती तूप 45 टक्‍क्‍यांनी आणि पामतेल 54.5 टक्‍क्‍यांनी महागलं असेल, तर तेल खायचं की तूप? स्वयंपाकघरातून फोडणीचा खमंग वास आल्यावर भुकेऐवजी भीती चाळवली जाणार असेल, तर घरात थांबून उपयोग नाही.

महागाईच्या भीतीपेक्षा विषाणूची भीती परवडली, असं म्हणून घरातून बाहेर पडावं तर पेट्रोल पंपावरचा वास फोडणीच्या वासापेक्षा उग्र भासतो. जी गत कढईतल्या तेलाची तीच वाहनाच्या टाकीतल्या तेलाची. प. बंगालातल्या निवडणुका संपल्यापासून आतापर्यंत सहा आठवड्यांत पेट्रोल, डीझेलची 24 वेळा भाववाढ झाली. राजकारणी मंडळींनी आपल्याला इतिहासात रमवण्यात यश मिळवलं असलं, तरी लगेच आपण गाडीऐवजी घोडा वापरणार आहोत का?

“उच्चांक’ हा शब्द पॉझिटिव्ह अर्थानं ऐकायची आता सवयच राहिली नाहीये. त्यामुळे तो ऐकला तरी भीती वाटते. घाऊक किंमत निर्देशांकाचा “उच्चांक’ झाल्याची बातमी नखशिखान्त हादरा देणारी ठरली. हा निर्देशांक मे महिन्यात 12.94 टक्‍क्‍यांवर पोहोचला असून, हा निर्देशांक अस्तित्वात आल्यापासूनचा “उच्चांक’ आहे म्हणे! घाऊक निर्देशांक वाढला की त्या पाठोपाठ दोनेक आठवड्यांनी किरकोळ निर्देशांक फुगतो. 

सध्या हा निर्देशांक गेल्या सहा महिन्यांतला सर्वाधिक म्हणजे 6.3 टक्‍के आहे. एप्रिल महिन्यातच हा दर 4.23 टक्‍के होता. हा दर 4 टक्‍क्‍यांपेक्षा कमी राहिला तर रिझर्व्ह बॅंक अनेक उपाययोजना करून अर्थव्यवस्था सावरण्याचे प्रयत्न करते. पण आता हा दर रिझर्व्ह बॅंकेच्याही आवाक्‍यात राहिलेला नाही. मग आपल्या आवाक्‍यात काय राहणार? स्वयंपाकाच्या गॅसपासून विजेपर्यंत कोणती गोष्ट आवाक्‍यात राहिलीय? गॅस सिलिंडरवरची सबसिडी ज्यांना शक्‍य असेल त्यांनी सोडावी, असं आवाहन काही वर्षांपूर्वी केलं गेलं. 

जोशात येऊन अनेकांनी सबसिडीवर पाणी सोडलंही आणि अशा मंडळींचं कौतुक झालं. पण आता सगळ्यांचीच सबसिडी गेली, त्याचं काय? लॉकडाऊनमुळे विजेच्या मीटरचं रीडिंग घ्यायला कुणी येत नाही. पण त्यानंतरचं वीजबिल किती येईल, या भीतीनं आपल्या हृदयाची गती वाढते.

ज्या मंडळींनी याविषयी दोन शब्द बोलणं अपेक्षित आहे, त्यांची वक्‍तव्यं भीतीत भर टाकणारी आहेत. या परिस्थितीचं गांभीर्य ना सत्ताधाऱ्यांना आहे, ना विरोधकांना. कोण कुणाला भेटायला गेलं? कोणत्या दोन नेत्यांमध्ये “शीतयुद्ध’ चाललंय? भविष्यात सत्ताधारी आणि विरोधकांच्या परिस्थितीत नेमका कोणता बदल होऊ शकतो? कोण कुणासोबत जाऊ शकतं? असे विषय राजकारण्यांनी धामधुमीच्या काळात गाजवणं आश्‍चर्यजनक नाहीच! आश्‍चर्यजनक आहे तुम्ही-आम्ही त्यांना दाद देणं. हाच सर्वांत मोठा “विक्रम’ आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.