अबाऊट टर्न : “अनवॉन्टेड’

जन्म आणि मृत्यू यामधील अंतराला आपण जीवन म्हणतो आणि या कालावधीत जास्तीत जास्त सुखी राहण्याचा प्रयत्न करतो. अर्थात, कुणाचं सुख कशात असावं हे व्यक्‍तीगणिक बदलतं; शिवाय सुख आणि समाधान यात बराच फरक असल्यामुळे सुखी कुणीच होत नाही. कारण सुख ही देहाला जाणवणारी स्थिती असते, तर समाधान ही मनाची एक अवस्था असते.

लॉकडाऊनच्या काळात असे आध्यात्मिक विचार सगळीकडे व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून फिरताहेत आणि लोकांना ते पटताहेतसुद्धा! अर्थात, घराबाहेर सूक्ष्मरूपात मृत्यू घोटाळत असताना आणि सुख “मानावं’ लागत असताना हे पटणं स्वाभाविक आहे. गरजा पूर्ण होत राहतात तेव्हा त्या वाढत राहतात; पण जेव्हा त्या पूर्णच होत नाहीत, तेव्हा आपल्या गरजा खरोखर किती कमी असतात आणि आपणच त्या किती वाढवून ठेवतो, वगैरे शहाणपण माणसाला सुचतं.

परंतु थोडा वेळ अशा गोष्टींचा विचार केल्यानंतर कधी एकदा लॉकडाऊन संपेल आणि आपण कधी एकदा “पूर्वीसारखे’ सुखी होऊ, हाच विचार अधिक प्रबळ ठरतो. मृत्यू अवतीभोवती फिरत असताना जन्मापासूनचा पट डोळ्यासमोरून जातो, असं म्हणतात. पण ज्यांचा जन्मच सुखाच्या अभिलाषेतून अपघातानं झाला, त्यांचं जीवन कसं असेल याचा विचार आपल्या मनात फार कमी वेळा येतो. अनेकदा जन्मानंतर अशा नकोशा अपत्यांचा त्याग केला जातो आणि अनेकदा तर जन्मापूर्वीच…

पोटातलं अपत्य सुदृढ आणि संस्कारित असावं म्हणून व्यायाम आणि “हेल्दी डाएट’पासून गर्भसंस्कारापर्यंत अनेक गोष्टी हल्ली केल्या जातात. पण ज्यानं नको असताना गर्भात प्रवेश केला, त्याला जगात प्रवेश करेपर्यंत कोणकोणत्या अवस्थांमधून जावं लागत असेल? आधी त्याला (बहुतांश वेळा “तिला’) पोटातच मारून टाकण्याचा प्रयत्न होतो आणि तो असफल ठरला, तर ते “अनवॉन्टेड’ अपत्य आजन्म कपाळावर अश्‍वत्थाम्यासारखी भळभळती जखम घेऊन जगतं.

आजच्या तंत्रसमृद्ध जमान्यात तर माणूस एक पाऊल पुढं गेलाय. जगात प्रवेश करण्यापूर्वी त्या अपत्याची चक्‍क विक्री करण्याइतका तो बेभान झालाय, याचं वैषम्य वाटल्यावाचून राहात नाही. अशी घटना आपल्या महाराष्ट्रात घडणं मनाला यातना देणारं आहे. सात महिन्यांच्या गर्भवतीनं ज्या अपत्याला अद्याप “फेस’ प्राप्त झालेला नाही, त्याला “फेसबुक’ दाखवलं.

जन्माला येताच या अपत्याची विक्री करण्यात येईल आणि त्याची किंमत पाच लाख रुपये असेल, अशी जाहिरात टाकली. ही महिला पतीसोबत राहात नाही; पण दिवस गेले असल्यामुळे अपत्य जन्माला आलं तर पुन्हा लग्न करण्यात अडथळा येईल, या धास्तीतून तिने हे लाजिरवाणं कृत्य केलं… बाळही नको आणि पैसाही मिळावा, अशा दुहेरी हेतूनं!

“अनवॉन्टेड’ मुलं जन्मानंतर अनाथाश्रमात सोडून दिल्याच्या किंवा उकिरड्यावर फेकून दिल्याच्या बातम्या आपण पूर्वीपासूनच ऐकतो आहोत. पण ज्यांना अपत्य नाही, अशांशी संपर्क साधून पोटातच असणाऱ्या बाळाची चक्‍क विक्री करण्याचा प्रयत्न धक्‍कादायक आहे.

अशी आधुनिक संपर्क माध्यमं आपल्यात हे कसलं विष पेरताहेत? अपत्यप्राप्तीसाठी तडफडणाऱ्यांचे विशिष्ट ग्रुप असावेत, त्यांच्यासाठी “खुशखबर’ घेऊन एक जाहिरात प्रसिद्ध व्हावी आणि जन्माला येण्यापूर्वीच बाळाची किंमत ठरावी, हे सगळं डोक्‍याबाहेरचं असलं तरी दुर्दैवानं वास्तव आहे.

– हिमांशू

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.