हिमांशू
एवढं कुणी रागावतं का? एका साध्या चौकशीचा एवढा धसका घ्यायचा? एवढं वाईट वाटून घ्यायचं? चौकश्या अनेकांच्या, अनेक वेळा, अनेक ठिकाणी आणि अनेक स्तरांवर होत असतात; पण म्हणून एवढं खचून जायचं? मान्य आहे, बॉलीवूडमध्ये दीपिका पदुकोण हे नाव आज खूप मोठ्ठं आहे. विशेषतः दोन ऐतिहासिक चित्रपटांमधल्या भूमिकांनी दीपिकाच्या लोकप्रियतेचा ग्राफ खूपच झपाट्यानं वर चढला.
“छपाक’ चांगला असूनसुद्धा गाजला नाही, हा भाग वेगळा; पण तिथं मॅनेजमेंट लेव्हलवर काहीतरी घोळ झाल्याचं ऐकीवात आहे. जेएनयूच्या विद्यार्थ्यांना भेटायला जाण्याचा निर्णय त्यावेळी नक्की कुणी घेतला होता, हे अजूनही कुणाला कळलेलं नाही. पण तेव्हापासून दीपिका निगेटिव्ह अर्थानंच अधिक चर्चेत आहे. बॉलीवूडचं ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्यावर दीपिका पुन्हा चर्चेत आली.
व्हॉट्सऍपच्या ज्या ग्रुपमध्ये ड्रग्जविषयी चर्चा झाल्याचा आरोप आहे, त्या ग्रुपची ऍडमिन दीपिकाच होती असं वाहिन्यांनी ओरडून-ओरडून सांगितलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने दीपिकाला चौकशीसाठी गोव्याहून दिल्लीला बोलावून घेतलं. चौकशीदरम्यान काय-काय झालं याचा मिनिटा-मिनिटांचा वृत्तांत वाहिन्यांनी सांगितला. चौकशी सुरू असताना ती दोन वेळा रडली, असंही प्रसिद्ध झालं. चौकशीनंतर तिच्या गाडीचा पाठलाग केला गेला. सिग्नलवर गाडी उभी राहिलेली असताना कॅमेरे गाडीच्या खिडकीला भिडले. या सगळ्या प्रकाराचा उबग येणं स्वाभाविक असलं तरी “हे’ बरं नव्हे!
बॉलीवूडलाच रामराम ठोकायचा निर्णय घेऊन दीपिकानं चक्क मोलमजुरी करून जगायचं ठरवलंय, हे ऐकून चाहत्यांच्या काळजावर चरा उमटला असेल. मुंबापुरी सगळ्यांना स्वप्नं दाखवून बोलावून घेते. काहींची स्वप्नं पूर्ण होत नाहीत म्हणून ते जड अंतःकरणानं मुंबई सोडतात, इथंपर्यंत ठीक आहे. परंतु एवढी लोकप्रियता संपादन केल्यानंतर दीपिकानं मुंबई सोडून मध्य प्रदेशात जावं आणि थेट रोजगार हमी योजनेवरच काम करावं, हे जरा अती होतंय. बरं, ती एकटीच गेली नाही तर सोबत जॅकलिन फर्नांडिसलाही सोबत घेऊन गेली.
खोटं वाटलं आणि धक्काही बसला; पण “मनरेगा’च्या स्थलांतरित मजुरांच्या यादीत दीपिकाचा फोटो आढळलाय एवढं नक्की! तिच्या नावाचं जॉबकार्ड तयार आहे, त्याअर्थी ती रोजंदारी करून पोट भरतेय. यापूर्वी सनी लिओनी ही बहुचर्चित अभिनेत्री अशीच रुसली होती. पण तिने लगेच मोलमजुरीचा मार्ग स्वीकारला नव्हता. बॉलिवूड सोडून ती बिहारमध्ये गेली आणि राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेला बसली. सनी ही इतर परीक्षार्थींच्या तुलनेत अर्थातच अधिक हुशार असल्यामुळे या परीक्षेत ती पहिली आली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. चौकशीअंती कळलं की, सरकारच्या ऑनलाइन भरतीप्रक्रियेची थट्टा करण्यासाठी कुणीतरी हे केलं होतं.
ऑनलाइन परीक्षा पद्धतीतल्या त्रुटी सनी लिओनीमुळे उघड झाल्या खऱ्या; पण दीपिकाचं काय? ज्या गावात, ज्या घरात ती “राहतेय’ ती माणसंही हादरलीत. हल्ली ही माणसंसुद्धा इंटरनेटवर जॉबकार्ड बघू शकतात. सोनू शांतिलाल नावाच्या व्यक्तीचं जॉबकार्ड; पण फोटो दीपिकाचा! नाल्याचं काम करण्यासाठी दीपिकानं पैसे घेतल्याची नोंद दिसतेय. तलाव आणि कॅनॉल ही कामं केल्याचे तर कुणालाच आठवत नाही; पण मजुरी सगळ्यांना “पोहोचली’ असं दिसतंय. दीपिकाचा रुसवा आता हळूहळू उलगडू लागलाय!