न्यूज अँकर बनून रोबो चॅनेलच्या न्यूजरूमपर्यंत पोहोचला; पण त्याला बातमी कोणती द्यावी लागतीये? माणसाला त्याची उत्क्रांती कशी झाली याचाच पत्ता अजून नाही आणि जी थिअरी मांडली जातेय ती तो सातत्यानं खोडून काढतोय. किती चमत्कारिक आहे हा विरोधाभास! यंत्रमानव उत्क्रांत होत चाललाय आणि माणूस उलट्या दिशेनं चालून भूतकाळात घुटमळलाय. एवढंच नव्हे तर साचेबद्धपणात त्याने यंत्रालाही मागं टाकलंय. सोशल मीडियावर जे येईल ते कोणताही विचार न करता पुढे ढकलायचं, एवढंच त्याला समजतंय.
आपल्या समोर जे काही येईल त्याच्या खरे-खोटेपणाविषयी त्याला यत्किंचित फिकीर राहिलेली नाही. त्याला त्याच्या गरजाही कळत नाहीत; उलट जाहिराती पाहून तो आपल्या गरजांची यादी बनवतोय. एआय तंत्रज्ञानावर चालणारा यंत्रमानव आपला “अल्गोरिदम’ स्वतः तयार करू लागलाय; पण हीच गोष्ट माणसाच्या मात्र हाती राहिलेली नाही. कुणीही यावं आणि “अल्गोरिदम’ सेट करून जावं, अशी मानवी मेंदूची अवस्था झालीय.
एकीकडे हुबेहूब माणसासारखा यंत्रमानव तयार करण्याची तर दुसरीकडे यंत्रासारखा मानव तयार करण्याची चढाओढ लागलीय. कॉग्निटिव्ह आर्किटेक्चर फॉर कोलॅबोरेटिव्ह टेक्नॉलॉजीज् यांनी मानवाचा आणि रोबोचा संवाद घडवून आणला आणि माणसाच्या तुलनेत रोबोमध्ये काय-काय कमी आहे, याच्या नोंदी घेतल्या. या कमतरता दूर करण्याचा प्रयत्न यापुढे केला जाणारंय. वातावरणाला, घटनांना प्रतिसाद देण्याची रोबोची क्षमता वाढवण्यावर काम सुरू झालंय.
या संवादादरम्यान शास्त्रज्ञांना असं जाणवलं की, प्रकाश कमी-अधिक झाल्यावर किंवा ठराविक ठिकाणी प्रतिक्रिया देताना रोबोच्या डोळ्यांच्या पापण्या माणसाच्या तुलनेत कमी लवतात. माणूस आपल्या भावभावना डोळ्यांमधून ज्या प्रकारे व्यक्त करतो, ते अजून रोबोला साधलेलं नाही. एवढंच नव्हे तर माणसाचे डोळे खोटं बोलत नाहीत, असं म्हणतात. किंबहुना माणूस खोटं बोलत असला, तरी त्याचे डोळे सत्य सांगून जातात. तसं रोबोच्या बाबतीत घडत नाही.
(अर्थात, या बाबतीत माणसावरच अधिक संशोधन करण्याची गरज आहे, कारण आता खोटं बोलताना माणसाचे डोळे सत्य सांगतातच असं नाही.) तात्पर्य एवढंच, की हुबेहूब माणसासारख्या प्रतिक्रिया डोळ्यांमधून देणारा यांत्रिक माणूस काही वर्षांतच आपल्यासमोर असेल. कदाचित तो स्टेजवर किंवा पडद्यावर अभिनयसुद्धा करताना दिसेल. माणूस एकमेकांसमोर अभिनय करण्यात गुंतलाय हे पाहून रोबो माणसाच्या हातून अभिनयाच्या क्षेत्रातला रोजगारही हिसकावून घेईल. एकेका क्षेत्रातला रोजगार एआय रोबो तसाही हिसकावू लागलाच आहे. त्यामुळे काही वर्षांनंतर माणसाने करायचं काय, हा प्रश्न उपस्थित होणारच आहे. त्यासाठीच कदाचित उत्क्रांतीच्या सिद्धान्तावर आक्षेप वगैरे घेऊन काम निर्माण केलं जातंय.
माणसाचा मूळ वंशज कोण याबाबत काहीही भाष्य न करणाऱ्या डार्विनच्या सिद्धान्तावरून आजमितीस पुन्हा एकदा वाद निर्माण केला जातोय. मानवाला ईश्वरी शक्तीनं निर्माण केलं, असं मानणाऱ्या जगभरातल्या तमाम लोकांचा तसाही डार्विनच्या सिद्धान्ताला पूर्वीपासून विरोध होताच. त्यालाच पुन्हा धार दिली जातेय. पूर्वीचा सिद्धान्त खोडण्यासाठी पुरावे लागतात, हेही कुणाला पटेना. काही वर्षांनी जेव्हा रोबो स्वतःच्या उत्क्रांतीचा इतिहास लिहील, तेव्हा “सर्वांत बुद्धिमान प्राणी’ असणारा मानव कुठे असेल, हा विचारच घाबरवणारा आहे.
हिमांशू