अबाऊट टर्न : प्राणवायू

हिमांशू

करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचं अंतिम दर्शनही कुणाला घेता येत नाही. पण किमान करोनामुळे प्राण जाताना रुग्णाची होणारी परिस्थिती तरी दिसायला हवीच होती, असे रस्त्यावरची गर्दी पाहून वाटतं. शरीरातली ऑक्‍सिजनची पातळी कमी-कमी होत जाते आणि शेवटी घुसमटून जीव जातो. हे घुसमटणं लोकांना दिसायला हवंच होतं.

किमान ऑक्‍सिजनला प्राणवायू का म्हणतात, हे तरी समजलं असतं. हाताच्या बोटाच्या टोकावर लावलेल्या ऑक्‍सीमीटर नावाच्या छोट्याशा यंत्रावरचा आकडा कमी-कमी होऊ लागला, की माणसाची काय अवस्था होते, हे सगळ्यांनाच एकदा दिसायला हवं. अन्यथा व्हॉट्‌सऍप विद्यापीठातून पीएचडी घेतलेले तज्ज्ञ “हा आजार नाहीच,’ असं सांगतच राहतील. करोना हा व्हायरस नसून ती एक दहशत आहे आणि बिल गेट्‌स यांच्या डोक्‍यातली ती केवळ एक संकल्पना आहे, असं विधान नुकतंच कुणीतरी केलं.

तत्पूर्वी हा आजार “विशिष्ट’ व्यक्‍तींनाच होतो, असंही कुणीतरी म्हणालं. अजूनही भारत हा उष्ण कटीबंधीय देश असल्यामुळे करोना आला आणि निघूनही गेला, असे संदेश फिरतायत. वर्षभरापेक्षा अधिक काळ हे सगळं सुरू आहे. लोक मृत्युमुखी पडतायत, हेही समोर दिसतंय. तरीसुद्धा अशी वक्‍तव्यं करणारे थकायला तयार नाहीत. प्राणवायूचं प्रमाण कमी होतं म्हणजे काय होतं, याचा कृत्रिम अनुभव अशा मंडळींना एकदा नाक दाबून दिला पाहिजे.

करोनाशिवाय दुसरा विषय चर्चेत नाही, त्याशिवाय कुणी बोलत नाही आणि ऐकतही नाही म्हणून घुसमट झालेल्या या माणसांचा प्रसिद्धी हाच ऑक्‍सिजन असतो. पंधरा दिवस केवळ आयपीएलवर बोलायचं असं सगळ्यांनी ठरवलं तर ही मंडळी क्रिकेटचंही असलेलं-नसलेलं ज्ञान पाजळू लागतील. काहीही करून या मंडळींना प्रसिद्धीच्या झोतात यायचं असतं आणि त्यासाठी कोणताही आधार त्यांना चालतो. करोना हा अशा मंडळींचा ऑक्‍सिजन झालाय. खरं तर ऑक्‍सिजन या एकाच विषयावर सध्या कितीतरी बोलता येण्याजोगं आहे. जो आपल्याला फुकट मिळतो म्हणून किंमत नाही, असा हा ऑक्‍सिजन सध्या रुग्णांसाठी मात्र कमी पडतोय. गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात केवळ ऑक्‍सिजनची कमतरता असल्यामुळे अवघ्या दीड तासात पंधरा लोक मृत्युमुखी पडले.

व्हॉट्‌सऍप विद्यापीठातील “प्राध्यापक’ मंडळींच्या म्हणण्यानुसार या पंधरा मृत्यूंनाही बिल गेट्‌स जबाबदार आहेत का? करोना नाहीच, तर यांना प्राणवायू कमी कसा पडला? आहे का या व्यक्‍तींकडे काही उत्तर? उगाच उचलली जीभ अन्‌…! मधून-मधून प्रसिद्धीचा झटका येणाऱ्या अशा निर्बुद्ध मंडळींनी किमान करोना हा त्यांचा प्राणवायू बनवता कामा नये आणि माध्यमांनीही अशा व्यक्‍तींना अवास्तव प्रसिद्धी देता कामा नये. ज्याचं काम त्याने करावं!

करोनामुळे जगभरात माणसं मरतायत आणि संपूर्ण जग त्यामुळे हबकलंय. पण अशा प्रसिद्धीलोलूप, टीआरपीग्रस्तांच्या मते हा एक “जागतिक गाढवपणा’ आहे. एक तर या विषाणूचं स्वरूप कुणाला समजेनासं झालंय. त्याची वाढ, प्रसार, उत्परिवर्तन या गोष्टी जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ जिवाचं रान करतायत. परंतु प्रसिद्धी हाच प्राणवायू बनलेल्यांना प्राणवायूविना मरणाऱ्यांचीही तमा नसावी, हे संतापजनक आहे. अशांना “एक वक्‍तव्य, एक झाड’ अशी शिक्षा द्यावी. किमान नैसर्गिक प्राणवायू तरी वाढेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.