हिमांशू
“जेसीबी की खुदाई’ हा काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावरचा एक लोकप्रिय हॅशटॅग ठरला होता. वास्तविक “निरर्थक’ एवढाच या हॅशटॅगचा अर्थ होता. “”भारतात जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरू असलं, तरी शेकडो रिकामटेकडी माणसं ते पाहत बसतात,” असं विधान एकानं केलं होतं आणि तिथून या हॅशटॅगला सुरुवात झाली होती. परंतु “जेसीबी की खुदाई’ वाटते तितकी निरर्थक नसते, हे ऑस्ट्रेलियातल्या काही घटना पाहिल्यावर लक्षात येतं.
एटीएम हे भारतासारखंच तिकडेही चोरांचं आवडतं लक्ष्य आहे. एकतर सोन्याचांदीचे दागिने चोरणं ही चोरट्यांना रिस्क वाटत असणार. जोपर्यंत दागिने बाजारात विकले जात नाहीत, तोपर्यंत चोरांच्या हातात पैसा येऊ शकत नाही आणि दागिन्यांची विक्री करताना चोरटे बऱ्याच वेळा पोलिसांच्या तावडीत सापडतात. त्याऐवजी एटीएम लुटलं तर एकदम धो-धो पैसा मिळू शकतो. आता कुणी म्हणेल, की एटीएमचा जेसीबीशी काय संबंध? या प्रश्नाचं उत्तर ऑस्ट्रेलियातल्या पोलिसांकडूनच मिळू शकेल.
कारण एटीएम लुटण्यासाठी थेट जेसीबीचा वापर करण्याच्या चोरट्यांच्या कार्यपद्धतीमुळं ते भलतेच हैराण झालेत. आपण खरोखर मागास आहोत, असं वाटायला लागलंय. आपल्याकडचे चोरटे तर भलतेच मागासलेले आहेत. कारण अजूनही कधी-कधी एटीएम मशीन म्हणून ते पासबुक प्रिंटिंग मशीनच उचलून नेतात.
आपल्याकडे किल्ल्याचा किंवा वाड्याचा दरवाजा भक्कम असेल, तर तो फोडण्यासाठी पूर्वी हत्तीचा वापर करीत असत. हेच तंत्र ऑस्ट्रेलियात चोरटे एटीएम फोडण्यासाठी वापरतायत. क्वीन्सलॅंड शहरात परवाच एका पठ्ठ्यानं जेसीबीवर स्वार होऊन एटीएमवर चढाई केली. इमारतीच्या परिसरात उभारलेले सगळे अडथळे तोडून हा जेसीबी एका मॉलच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या एटीएमजवळ थांबला. लोखंडी पंजानं एटीएमची संपूर्ण खोली उद्ध्वस्त केली. त्या अजस्र पंजात एटीएम मशीन उचललं आणि आल्या वाटेनं चालता झाला. हे संपूर्ण दृश्य तिथल्या सर्व्हिलन्स कॅमेऱ्यानं चित्रित केलं.
नोव्हेंबरमध्ये तर चित्रपटात शोभेल अशी घटना ऑस्ट्रेलियात घडली होती. एका दुकानाच्या परिसरात असलेलं एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी आपली मोटार इमारतीत घुसवली. मोटार निकामी झाली तरी एटीएममधून मिळणाऱ्या पैशातून अशा दहा गाड्या घेता येतील, असा हिशोब असावा. वारंवार दिलेल्या धडकांनी भिंत पडली; पण अनेक प्रयत्न करूनसुद्धा एटीएम मशीन जागचं हललं नाही. अखेर हताश होऊन आपल्या मोडक्या मोटारीसह चोरटे परतले. या घटनेचा व्हायरल व्हिडिओ एखाद्या कॉमेडी शोसारखा लोकप्रिय झाला. चोरांची फजिती आणि मोटारीची अवस्था पाहून लोकांनी पोटभर हसून घेतलं. या चोरट्यांना कदाचित जेसीबी उपलब्ध झाला नसावा.
मोटारीच्या साह्यानं एटीएम उखडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना अनेक नेटकऱ्यांनी करिअर बदलण्याचा आणि कॉमेडी शोमध्ये नशीब आजमावण्याचा सल्लाही दिला. चोरट्यांचे एक लाख डॉलरचं नुकसान मात्र झालं. जेसीबी घुसवून एटीएम मशीनच उचलून नेण्याचे प्रकार मात्र ऑस्ट्रेलियात अगदी 2015 पासून घडतायत. या अक्राळविक्राळ चोरट्यांचा बंदोबस्त कसा करायचा, हेच कोडं पोलिसांना पडलंय. पाहा, दुनिया कुठं पोहोचलीय. आपल्याकडे अजून “जेसीबी की खुदाई’च चाललीय!