अलीकडे काही जाहिरातींमध्ये नवरा किचनमध्ये काम करताना किंवा लग्नापूर्वी भावी पत्नीला तसं आश्वासन देताना दिसतो. मग आमच्या प्रॉडक्टमुळं ते काम कसं सोपं होईल, हे सांगितलं जातं. म्हणजेच, घरकाम सुसह्य करण्याची इच्छा व्हावी म्हणून या पितृसत्ताक समाजात पुरुषाला पुढे करावं लागतं. अशा जाहिराती महिलावर्गाला लगेच भावतात.
नवरा किचनमध्ये येऊन काम करेल किंवा आपल्याला मदत करेल, याची ज्या महिलांना सुतराम शक्यता वाटत नसते, त्यांना या जाहिराती अधिक आवडत असाव्यात. आपलं काम हलकं करायला नवरा आला नाही तरी हे प्रॉडक्ट धावून येईल, अशी आशा त्यांना वाटत असणार. एका सर्वेक्षणानुसार, भारताच्या एकंदर श्रमशक्तीत महिलांचा सहभाग अवघा 15 टक्के आहे. हे आहे कामाचा मोबदला मिळणाऱ्या महिलांचं प्रमाण.वास्तविक महिलांच्या श्रमांचं मोजमाप पैशांच्या रूपात करायचं झाल्यास आपला जीडीपी कित्येक पटींनी वाढेल.
चूल आणि मूल एवढंच महिलांचं कार्यक्षेत्र मर्यादित राहिलेलं नाही, असा कितीही डांगोरा पिटला, तरी आजही महिलांच्या वाट्याला मुख्यत्वे घरकाम येतं. महिला पुरुषांच्या तुलनेत 9.8 पट अधिक वेळ घरकाम करतात आणि हे सगळं काम “अनपेड’ असतं. आजही 40 टक्के भारतीय मुलींना शिक्षण घेता येत नाही आणि त्यांना सक्तीनं घरकाम करावं लागतं. ते “कर्तव्य’च असल्यामुळे या कामाचं मूल्यमापन करावं, असा विचार आजही कुणाच्या मनाला शिवत नाही.
स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी खेड्यातली स्त्री आपल्याच शेतात विनामोबदला मजूर म्हणून राबते आणि घरी आल्यावर भाकरी थापते. प्रगत तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात कामाचं मोजमाप करणारं एखादं ऍप असायला काय हरकत आहे? आपल्याकडे हा विचार कुणाच्या डोक्यातसुद्धा येणार नाही. पण जिथं या कारणावरून माजी पत्नीला लाखो रुपये देण्याची वेळ एखाद्या पुरुषावर येते, त्या देशातच हे घडू शकतं.
स्पेनमध्ये अशा घटनांवरून पती-पत्नीमध्ये वाद होण्याच्या असंख्य घटना घडल्या. त्यातल्या बऱ्याच कोर्टात गेल्या आणि बिनपगारी काम करवून घेतल्याबद्दल पत्नीला भरपाई देण्याची वेळ अनेक नवऱ्यांवर आली. अशा खटल्यांची वाढती संख्या विचारात घेऊन स्पेनच्या सरकारने एक ऍप विकसित केलंय. घरात कोण किती काम करतं, यावर लक्ष ठेवण्याचं काम हे ऍप करणार असून, त्याची नेमकी कार्यप्रणाली कशी असेल, हे सरकारने गुप्त ठेवलंय. या ऍपमुळं पती-पत्नीच्या कामांवर नजर ठेवणारा स्पेन हा पहिला देश ठरलाय. मुळात स्पेनमध्ये “जेंडर इक्वॅलिटी’ नावाचं खातं आहे, हेच आपल्याकडे कुणाला पटणार नाही. या खात्यानं हे ऍप याच वर्षी लॉंच करायचं ठरवलंय.
नव्या ऍपच्या मदतीनं घरातल्या कामांचं वाटप कुटुंबातल्या सर्वांना करता येणार आहे. हे वाटप “समान आणि न्याय्य’ असेल, याची काळजी ऍपच घेईल. महिलांच्या न मोजल्या जाणाऱ्या कामांबरोबरच त्यांच्यावरील मानसिक दडपणाची “मोजदाद’ हे ऍप करणारंय म्हणे! महिलांना सशक्त बनवण्याच्या आणि लैंगिक विषमता दूर करण्याच्या स्पेनमधील प्रयत्नांचा हा केवळ एक भाग आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जे पिकतं ते लगबगीनं विकत घेण्यासाठी आसूसलेले आपण या ऍपकडे ढुंकूनसुद्धा पाहणार नाही, याची खात्री आहे.
हिमांशू