अबाऊट टर्न : चुकून…

– हिमांशु

हल्ली मोठमोठ्या गोष्टी “चुकून’ होतात आणि वारंवार होतात, याचं नवल वाटतं. व्यावसायिक नीतिमत्तेचा “आदर्श वस्तुपाठ’ म्हणून ज्या कंपनीकडे पाहावं, त्या फेसबुककडून चूक होणं म्हणजे खरं तर “चूक’ या शब्दाचंच अवमूल्यन. इतरांचा न्यूज कंटेन्ट निःशुल्क वापरल्याबद्दल या कंपन्यांवर आक्षेप घेतले गेले असतील; पण म्हणून काय कंपनीचं काम खरोखर आक्षेपार्ह ठरतं की काय? आज फेसबुक म्हणजे सर्वसामान्यांचा केवढा आधार आहे! अशा कंपनीकडून चूक म्हणजे जरा जास्तच होतंय ना? पण कंपनीनेच तसं म्हटलंय म्हणजे आपणही तसं म्हणायला हवं ना?

एक “हॅशटॅग’ आपल्याकडून “चुकून’ ब्लॉक केला गेला, असं फेसबुकनं सांगितलं. बरेच तास बंद असलेला तो “हॅशटॅग’ कंपनीनं पुन्हा सुरू केला, त्याला कारणही तसंच घडलं. कंपनीवर थेट लोकशाही संकटात आणल्याचा आरोप झाला. “हॅशटॅग’ मात्र भलताच आक्षेपार्ह होता- “रिजाइन मोदी’! “तो बंद करण्यासाठी भारत सरकारकडून कोणतीही सूचना आली नव्हती,’ असं कंपनीनं सांगून टाकलं.

करोनाचं संकट वाढत असल्यामुळं देशाचे नायक म्हणून पंतप्रधानांवर टीका सुरू झाली. त्यासाठी वेगवेगळे हॅशटॅग सुरू झाले आणि “रिजाइन मोदी’ या टॅगला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. हे टीकासत्र अचानक थांबलं ते हॅशटॅग ब्लॉक झाल्यामुळं. मग नेटकऱ्यांनी फेसबुकवर आगपाखड करण्यासाठी ट्‌विटरचा आधार घेतला. तिकडे फेसबुकवर टीका होतीय म्हटल्यवर इकडे हॅशटॅग रिस्टोअर झाला आणि “चुकून घडलं’ असं कंपनीने सांगून टाकलं.

वस्तुतः कंटेन्ट पाहून हॅशटॅग ब्लॉक करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक मॅन्युअल आणि दुसरी ऑटोमॅटिक. नेटकऱ्यांनी सर्च केल्यावर “कम्युनिटी स्टॅंडर्डचं उल्लंघन झाल्यामुळं’ हॅशटॅग बंद केल्याचा संदेश येत होता. हे सगळं “चुकून’ घडलं असं कंपनीचं खरोखर मत असेल तर “आघाडीची टेक कंपनी’ या बिरुदाचा कंपनीने खरोखर फेरविचार करायला हवा. कारण अशा “चुकां’चा नेटकऱ्यांना मोठा धक्का बसतो. अहो, मागे मुंबईत शेतकरी सापडले होते तेव्हाही एवढा धक्का बसला नव्हता. पीककर्जाच्या माफीची कागदपत्रं तपासताना काहीजण मुंबईत चक्क शेती करतात असं दिसून आलं होतं.

नाही, ती नुसती चूक म्हणता येत नाही. ती “नजरचूक’ असते. आमच्या अर्थमंत्री मॅडम अचानक एके दिवशी बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कपात जाहीर करतात. दुसऱ्या दिवशी तो निर्णय “रद्द’ करतात, कारण तो “नजरचुकीने’ झालेला असतो. एवढं करून दुसऱ्या दिवशी छापून येतं, की अर्थमंत्र्यांनी “दिलासा’ दिला… तोही मोठ्ठा! या सगळ्याचा अर्थ आम्हा पामरांना कळेनासा होतो. आपल्या देशात अशा किती गोष्टी “चुकून’ होणार आहेत, या कल्पनेनं आम्ही घाबरलोय.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.