मुंबई – ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना जामिन मंजूर होताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. संजय राऊत यांचं जंगी स्वागत शिवसैनिकांनी केलं. यानंतर राऊतांनी मरेन पण शिवसेना सोडणार नाही असा विश्वास कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला. तसेच त्यानंतर पत्रकारांशी सवांद साधताना राऊत म्हणाले होते शिवसेनेत गट तट काहीच नाही. शिवसेना एकच आहे. शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी आता संजय राऊतांच्या या विधानावर भाष्य केलं आहे.
शिवसेना एकत्रच आहे. बाळासाहेबांची शिवसेना आहे जे उद्धव ठाकरे म्हणतात तेच एकनाथ शिंदे देखील म्हणत आहेत असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं. पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी राऊतांच्या विधानावर आपले मत व्यक्त केले. आम्हीही तेच म्हणतोय,शिवसेना ही बाळासाहेबांनीच आहे. आम्ही देखील शिवसेनाप्रमुखांची सेना म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम करतोय आणि पुढच्या काळात शिवसेनाप्रमुखांना आवडेल असेच काम ही शिवसेना करणार असल्याचा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांनी आपण आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांना देखील भेटणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्याबाबत बोलताना पाटील म्हणाले,त्यांनी कोणाला भेटावं हा त्यांचा विषय आहे. तसेच राऊतांनी नरमाईची भूमिका घेतली आहे असं तुम्हाला वाटत का असा सवाल पाटील यांना विचारला असता,आपण त्यावर काही भाष्य करू इच्छित नाही शेवटी हा ज्याच्या त्याच्या स्वभावाचा विषय असल्याचे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.