पुणे – मार्केट यार्डातील फळ विभागात वर्षभरात दंडात्मक कारवाई करून 1 लाख 48 हजार 444 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. गाळ्यापासून 15 फुटांच्या पुढे शेतीमालाची विक्री करणे, अनाधिकृतपणे विक्री करणारे विक्रेते, रहदारीस अडथळा करणारी वाहने आणि मास्क न वापरणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. फळ विभागाचे गटप्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी विभागप्रमुख बाबासाहेब बिबवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.
1 नोव्हेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे. बाजाराला शिस्त लागावी, यासाठी बाजार समिती प्रशानच्या वतीने ही कारवाई करण्यात येते. गाळ्यापासून 15 फुटाच्या बाहेर फळे विक्री करण्यास विक्रेत्यांना मज्जाव करण्यात आले आहे. तरीही काही विक्रेते 15 फुटाच्या बाहेर जावून विक्री करतात. त्यांच्यावर आणि वाहतुकीस अडथळा येईल अशा ठिकाणी वाहने लावण्यात येतात. त्या वाहनांच्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते.
तर काही विक्रेते अनाधिकृतपणे विक्री करतात. त्याच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येते. सध्या करोना संसर्गाची साथ सुरू आहे. करोनापासून बचावासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे. पोलीस ठिकठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिक, वाहन चालंकावर कारवाई करत आहेत. याच धर्तीवर बाजार आवारात बाजार समिती प्रशासनाच्या वतीनेही विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. फळ विभागातही अशी कारवाई करण्यात येत असल्याचे बाळासाहेब कोंडे यांनी सांगितले.