इनडोअर प्लॅंटस्‌विषयी थोडेसे

हिरवाईशी मैत्री कोणाला आवडत नाही? सर्वांना निसर्ग जवळ असावा असा वाटतो, पण या सिमेंटच्या जंगलामध्ये आणि अपुऱ्या जागेमुळे हिरवाई किंवा बगिचाचे स्वप्न पूर्ण होत नाही. इनडोअर प्लॅंटस्‌ तुमचे बगिचाचे स्वप्न पूर्ण करू शकतात. यामुळे घरच्या घरी बगिचा बनवू शकता. घरांचे ब्लॉक झाल्यामुळे यामध्ये कुंड्या ठेवून किंवा हॅंगिंग बास्केट ठेवून घरातील भिंतीवर वेल सोडू शकता. असे इनडोअर प्लॅंटस्‌ घराच्या सजावटीत भर घालतातच शिवाय घरात सुखकारक आणि आनंदी वातावरणाची निर्मितीही करतात. घराच्या दिवाणखान्यात सोफ्याशेजारी, जिन्यांच्या पायऱ्यावर तसेच इनडोअर प्लॅंटची कुंडी ठेवावी.

घरामध्ये कुंडी ठेवल्याने तुमच्या घराची इंटेरियरची कमी तुम्ही झाकू शकता. घरात मोजकेच फर्निचर असल्याने तुम्हाला त्याच्या जागी एखादी कुंडी ठेवू शकता. घरात अथवा गॅलरीत कुंड्या ठेवायला जागा नसेल तर एका प्लॅस्टिकच्या बास्केटमध्ये शो ची रोपे लावून ते टांगून ठेवू शकता. तसेच लहान लहान कुंड्यांमध्ये बोगनवेली, मालती, चमेली, मनी प्लॅंटस्‌ अशी रोपे लावून गृहसजावटीत भर घालू शकता. चायनीज कुंड्या हल्ली बाजारात मोठ्या प्रमाणात मिळतात. त्याच्यामध्ये रोपे लावून घरातील उपयुक्त कोपऱ्यामध्ये ठेवण्याची हल्ली फॅशन दिसून येते. या कुंड्यावर तुम्ही तुमचे आवडते पेंटिगही करू शकता.

इनडोअर प्लॅंटस्‌ लावताना थोडी काळजी घ्यावी लागते. ती म्हणजे प्लॅस्टिकच्या कुंडीत रोपे जगत नाहीत. मरून जातात. म्हणून आधी मातीच्या कुंडीत रोपे लावून ती जगल्यानंतर ती प्लॅस्टिकच्या कुंडीत लावावी. रोपटे फुलदाणीत ठेवायचे असल्यास फुलदाणीत आधी थोडे पाणी ठेवावे. म्हणजे ते जास्त दिवस राहते. स्प्रेद्वारे पानांची नियमित साफसफाई करावी. वर्षातून एकदा कुंडीतील माती बदलून टाकावी. इनडोअर प्लॅंटस्‌ला दोन दिवसांतून एकदा पाणी दिले तरी चालते. इनडोअर प्लॅंटस्‌वर सूर्याची सरळ किरणे येऊ देऊ नयेत. आठवड्यातून एकदा रोपट्यांना खुल्या हवेत ठेवावेत. महिन्यातून एकदा बोनमिल पावडर कुंडीत टाकावी. इतकी काळजी घेतली की तुमचे घर हिरवाईने नटून जाईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.