बापरे! पुण्यातील करोना बळींपैकी 40 टक्के मृत्यु ससूनमध्ये

खासगी रूग्णालयांनी उपचारास नकार दिल्यामुळे ससूनमध्ये दाखल

  • उपचारास उशीर झाल्यामुळे ससूनमध्ये मृत्युची संख्या वाढली

पुणे – करोनामुळे शहरात 4 हजार 86 जणांचा मृत्यु झाला. एकट्या ससून रूग्णालयात 1 हजार 605 बाधितांच्या मृत्युची नोंद झाली. हे प्रमाण 40 टक्के आहे. त्यापैकी 142 जणांचा म्हणजे 9 टक्के मृत्यु हे ससूनमध्ये उपचार सुरू करण्यापूर्वीच झाले. वाढत्या संसर्गाच्या काळात खासगी रूग्णालयांकडून अत्यवस्थ बाधितांना थेट ससून रूग्णालयात पाठवले जात होते. तो ससूनमध्ये पोहचेपर्यंत खूप उशीर झाला असल्याची दुसरी बाजू आता उजेडडात येत आहे.

 

शहरात करोनाचा पहिला बाधित 9 मार्च रोजी सापडला. तर 2 एप्रिल रोजी पहिला बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. त्यावेळी प्रथमत: नायडू, ससून आणि काही मोजक्या रूग्णालयात बाधितांवर उपचार होत होते. तज्ज्ञांच्या सल्लयाने बाधिताला लक्षणानुसार औषधे देत असत.

 

मार्च, ते सप्टेंबर महिन्यात बाधितांसह मृतांची संख्या वाढत होती. त्यामध्ये ससून रूग्णालयात मृतांचे प्रमाण अधिक होते. त्यावरून रंगलेल्या राजकीय षडयंत्रात तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली केली. त्यानंतरही ससूनमधील मृत्युचे वाढतेच राहिले. बाधिताला उपचारासाठी उशीर झाल्यास व्हेंटीलेटर गरज भासत होती. ते कमी पडल्याने अनेकांचा मृत्यु झाला.

 

करोनाच्या काळात सुरवातीपासून काही ठरावीक खासगी रूग्णालये सोडली तर अन्य सर्व रूग्णालये अत्यवस्थ बाधितांना उपचार देण्यास टाळाटाळ करत, बाधिताला ससून किंवा नायडू रूग्णालयात जाण्याचा सल्ला देत होते. मात्र, नायडूनमध्ये व्हेंटीलेटरची सुविधा तटपुंजी होती, त्यामुळे ससून रूग्णालयाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत रूग्णालयावर ताण येत असतानाही येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून रूग्णांना उपचार दिले जात असत.

2, 669 बाधित करोनामुक्त

ससून रूग्णालयात आतापर्यंत 4 हजार 758 बाधितांना उपचार देण्यात आले. त्यामध्ये 2 हजार 669 बाधित करोनामुक्त झाले आहेत. तर 1 हजार 605 बाधितांचा मृत्यु झाला. आतापर्यंत 15 हजार 133 संशयित व्यक्तींचा अहवाल निगेटीव्ह आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.