नवी दिल्ली -देशात दिवसागणिक नवे करोनाबाधित आढळण्याचा मागील विक्रम मोडीत निघत आहे. गुरूवारी आणखी 16 हजार 922 बाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशात एकाच दिवसात आढळलेल्या बाधितांचा नवा उच्चांक नोंदला गेला.
देशातील करोना संकट आणखी गहिरे होत असल्याचे दुर्दैवी चित्र चालू महिन्यात पुढे आले आहे. देशात सलग 6 दिवस 14 हजारांहून अधिक करोनाबाधित आढळले. त्या कालावधीत बाधितांमध्ये 92 हजार 573 संख्येची भर पडली. जूनमधील 25 दिवसांत देशात 2 लाख 82 हजारहून अधिक बाधितांची नोंद झाली. महाराष्ट्रात देशातील सर्वांधिक बाधित आहेत.
त्याखालोखाल दिल्लीचा क्रमांक लागला आहे. बुधवारी दिल्लीतील बाधितांच्या संख्येने 70 हजारांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे मुंबईला मागे टाकून दिल्ली हे देशातील सर्वांधिक करोनाबाधितांचे शहर बनले आहे. दरम्यान, करोना संसर्गाने आणखी 418 बाधित दगावले.
त्यामुळे देशातील करोनाबळींची संख्या 15 हजारांवर गेली आहे. देशात महाराष्ट्रातच सर्वांधिक बळींची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ दिल्लीत 2 हजार 300 हून अधिक, तर गुजरातमध्ये 1 हजार 700 हून अधिक बाधित मृत्युमुखी पडले आहेत.