Abhishek Manu Singhvi Net Worth: संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असून यादरम्यान मोठा गोंधळ झाला आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी काल सभागृह स्थगित झाल्यानंतर सीट क्रमांक 222 च्या खाली नोटांचं बंडल सापडल्याची माहिती दिली. ही सीट काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवींच्या नावे आहे. दरम्यान, अभिषेक मनु सिंघवी यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.
अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं की, मी याबद्दल ऐकूनच हैराण आहे. मी याबद्दल कधीच ऐकलेलं नाही. मी काल दुपारी 12.57 ला सभागृहात दाखल झालो होतो. सभागृह दुपारी 1 वाजता स्थगित झालं होतं. यानंतर दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंत मी अयोध्याचे खासदार अवधेश प्रसाद यांच्यासह कँटीनमध्ये जेवायला बसलो होतो. दुपारी 1.30 वाजता मी सभागृहात गेलो. यामुळे मी काल सभागृहात 3 मिनिट आणि कँटीनमध्ये 30 मिनिट होतो. या मुद्द्यांचं राजकारण केलं जातं याचं मला फार विचित्र वाटतं. लोक कुठेही आणि कोणत्याही सीटवर काहीही ठेवून जातात याची नक्कीच चौकशी झाली पाहिजे.
सिंघवी यांनी पुढे सांगितलं आहे की, याचा अर्थ आमच्यापैकी प्रत्येकाकडे एक सीट असली पाहिजे आणि ती सीट लॉक करता आली पाहिजे. चावी सोबत नेण्याची परवानगी असावी, अन्यथा कोणी काहीही करु शकतं आणि यावरुन आरोप लावू शकतं. जर हे दु:खद आणि गंभीर नसतं तर हास्यास्पद असतं. मला वाटतं याच्या मुळाशी जाण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य केलं पाहिजे. जर सुरक्षा यंत्रणांमध्ये काही त्रुटी असेल तर त्यादेखील उघड करायला हव्यात. मी जेव्हा कधी सभागृहात जातो तेव्हा 500 रुपयेच घेऊन जातो असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
दरम्यान, राज्यसभा सदस्य अभिषेक मनू सिंघवी सध्या वादात सापडले आहेत. राज्यसभेत त्यांच्या सीटखाली चलनी नोटांचा गठ्ठा सापडल्यापासून राजकीय वर्तुळात वादळ उठले आहे. काँग्रेसवर भाजप आक्रमक झाले आहे, अनेक गंभीर आरोप होत आहेत. अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पष्टीकरण नक्कीच मांडले आहे, मात्र हा वाद अजूनही थांबताना दिसत नाही. दरम्यान, अभिषेक मनू सिंघवी यांची एकूण संपत्ती काय असेल, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत आहे.
अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती-
काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता, तेव्हा त्यांनी उमेदवारी अर्जात त्यांच्याकडे किती संपत्ती होती याचा उल्लेख केला होता. त्या प्रतिज्ञापत्रानुसार सिंघवी यांची एकूण संपत्ती 360 कोटी रुपये आहे. तर 2021-22 मध्ये हा आकडा 291 कोटी रुपये होता. अभिषेक मनु सिंघवी यांची पत्नी अनिता सिंघवी यांच्याकडेही 11.42 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
सिंघवी यांनी कुठे गुंतवणूक केली?
ही अधिकृत आकडेवारी असली तरी सिंघवी यांची खरी संपत्ती यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे. त्या अहवालानुसार सिंघवी यांच्याकडे 649 कोटी रुपयांची संपत्ती असून 3 कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यात आहेत. याशिवाय, त्यांनी शेअर्स आणि बाँड्समध्ये 368 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 2006 मध्ये सिंघवी यांची संपत्ती 77.67 कोटी रुपये होती, ती आता 1921 कोटी रुपयांवर पोहोचली आहे, म्हणजे 2374% वाढल्याचा आरोप भाजपने केला आहे.
सिंघवी वकील म्हणून किती पैसे घेतात?
नेता होण्याआधी अभिषेक मनु सिंघवी हे वकील आहेत. जे गेली 40 वर्षे प्रॅक्टिस करत आहेत. ते त्यांच्या एका क्लायंटकडून 6 ते 11 लाख रुपये घेतात, असे सांगितले जाते. ही रक्कमही एकदा न्यायालयात हजर राहण्यासाठी आहे. मात्र सध्या हे ज्येष्ठ वकील एका मोठ्या खटल्यात अडकले आहेत. त्यांच्या राज्यसभेच्या सीटखालील पैशांचं सत्य शोधणं हा एक अतिशय गंभीर मुद्दा बनला आहे.
नेमकं काय झालं?
राज्यसभा सुरू झाल्यानंतर सकाळच्या सत्रात अचानकपणे राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांनी सर्व सदस्यांच्या निदर्शनास एक घटना आणून दिली. काल रात्री संसदेतील सुरक्षा कर्मचारी तपासणी करत असताना 222 क्रमांकाच्या सीटखाली काही नोटांचं बंडल आढळलं. या नोटा काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्या सीटखाली सापडल्याचं सभापतींनी सांगितलं. या नोटा ख-या आहेत की खोट्या आणि नोटा राज्यसभेत कशा आल्या यावर चौकशी करणे गरजेचं असल्याचं सभापतींनी सांगितले आणि चौकशीचे आदेश दिले.
दरम्यान ही संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी घटला असल्याचं सांगून जे पी नड्डा यांनी काँग्रेस खासदारांवर आरोप केले. तर कांग्रेस खासदार असं कृत्य करणार नसल्याचे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हंटले.