मुंबई – अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची लाडकी लेक ‘आराध्या बच्चन’ एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. आईवडिलांप्रमाणेच ती कायम लाइमलाइटमध्ये असते. सार्वजनिक ठिकाणी आराध्या कायम आपल्या आई-वडिलांसोबत दिसते.
मग ते विमानतळ असो, एखादे मंदिर असो, किंवा एखादा इव्हेंट आराध्या कायम या दोघांसोबत दिसून येते. आराध्या सुद्धा चांगलीच लोकप्रिय असून तिला सुद्धा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
दरम्यान, आपल्या लेकीवर होणाऱ्या टिकेबद्दल तिचे वडील म्हणजेच अभिषेक बच्चन याने परखड भाष्य केलं आहे. एवढेच नाहीतर अभिषेक ट्रोल्सवर सुद्धा चांगलाच भडकला आहे. अभिषेक त्याच्या आगामी ‘बॉब बिस्वास’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
या सिनेमाचे प्रमोशनवेळी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की, ‘अशा पद्धतीने टीका होणे कुणीच स्वीकारू शकत नाही. या गोष्टी मी देखील सहन करू शकत नाही.
अभिनेता असल्याने मी पब्लिक फिगर आहे. परंतु माझी मुलगी या सर्वांपासून दूर आहे. जर तुम्हाला काही सांगायचे असेल, बोलायचे असेल तर माझ्या समोर येऊन बोला…’ असं अभिषेक म्हणाला.