खंडणीच्या गुन्ह्यात आज सुनावणी
कारागृहातील मुक्काम अद्याप कायम
सातारा – “बिग बॉस’च्या घरामधून अटक केलेल्या अभिजित बिचुकलेला दोन गुन्ह्यांमध्ये जामीन झाला असून, खंडणीच्या तिसऱ्या गुन्ह्याची सुनावणी गुरूवारी दि. 25 रोजी होणार आहे, अशी माहिती ऍड. श्रीकांत हुटगीकर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, अभिजित बिचुकले याला धनादेश न वटल्याप्रकरणी गुन्ह्यात सातारा पोलिसांनी गेल्या महिन्यात अटक केली होती. त्यानंतर त्याच्यावर पूर्वी दाखल असलेल्या खंडणी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच बिचुकलेला धनादेश प्रकरणामध्ये जामीन मिळाला होता. दरम्यान, जिल्हा न्यायालयात बुधवारी शासकीय कामात अडथळ्याबाबतच्या गुन्ह्याची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने बिचुकलेला 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. बिचुकलेवर आता खंडणीच्या गुन्ह्याची सुनावणी बाकी असून, हा खटलाही लवकरात लवकर निकाला काढा, असे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे या खटल्याची सुनावणी गुरूवारी दि. 25 रोजी होणार आहे. या खटल्यामध्ये एका साक्षीदाराची उलटतपासणी झाल्यानंतर बिचुकलेचा जामीन अर्ज न्यायालयापुढे सादर केला जाणार आहे.