- 1 लाख 10 हजार थकबाकीदारांनी घेतला योजनेचा लाभ
पुणे – गेल्या आठ महिन्यांपासून करोनामुळे आर्थिक उत्पन्नाचा ताळमेळ ढासळलेल्या महापालिकेस मिळकतकर थकबाकीदारांच्या अभय योजनेमुळे दिलासा मिळाला. यातून तब्बल 341 कोटींचा महसूल मिळाला आहे.
योजनेचा मागील दोन महिन्यांत सुमारे 1 लाख 10 हजार 110 मिळकतधारकांनी लाभ घेतला असून पुढील आर्थिक वर्षापासून हे नियमित मिळकतधारक होणार आहेत. त्यामुळे पालिकेस पुढील वर्षापासून सुमारे 300 कोटींचे उत्पन्न वाढणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि कर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.
महापालिकेची मिळकतकर थकबाकी सुमारे साडेपाच हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे. कर न भरणाऱ्या मिळकतकरावर प्रतिमाह 2 टक्के दंड आकारला जातो. त्यामुळी दरवर्षी ही थकबाकी फुगतच असून कर न भरणारे सुमारे साडेतीन लाख थकबाकीदार आहेत.
त्यातील अनेक थकबाकीदार नियमित कर भरण्यास तयार असले तरी त्यांच्याकडून दंडाच्या रकमेत सूट देण्याची मागणी केली होती. त्यामुळे, प्रशासनाकडून या थकाबाकीदारांसाठी अभय योजना प्रस्तावित केली.
2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी ही योजना होती. याच्या शेवटाच्या दिवशी सुमारे 32 कोटी 60 लाख रुपयांचा कर थकबाकीदारांनी जमा केला. त्यामुळे या योजनेत मिळालेल्या उत्पन्नाने महापालिकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत तब्बल 1,190 कोटींचे उत्पन्न मिळविले आहे. तर, मागील वर्षात सर्वसामान्य स्थिती असतानाही पालिकेस अवघे 1006 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. परिणामी अभय योजना पालिकेसाठी आर्थिक दिलासा देणारी ठरली आहे.