पुणे – मिळकतकराच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेकडून राबवलेल्या अभय योजनेस मंगळवारी झालेल्या स्थायी समितीत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. महापालिकेकडून 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ही योजना राबविण्यात आली. त्यानंतर या योजनेस मुदतवाढ देण्यात येणार होती.
मात्र, पदवीधर आणि शिक्षक विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता असल्याने मुदतवाढ देता आली नव्हती. अखेर मंगळवारी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार, 10 ते 31 डिसेंबर या कालावधीसाठी 75 टक्के सवलत, तर 1 ते 26 जानेवारी या कालावधीसाठी दंडाच्या रकमेत 70 टक्के सवलत देण्यात येणार आहे.
मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी पालिकेने दि. 2 ऑक्टोबरपासून “अभय’ योजना लागू केली. यांतर्गत 50 लाखांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या करदात्यांना मिळकतकरावर आकारलेल्या दंडाच्या रकमेत 80 टक्के सूट देण्यात आली होती. त्यानंतर, करोनाकाळातही तब्बल 1 लाख 12 हजार मिळकतधारकांनी 354 कोटींचा महसूल जमा केला. तर, हे मिळकतधारक आता नियमित मिळकतधारक बनले असून त्यांच्याकडून दरवर्षी पालिकेस कर मिळणार आहे.
दरम्यान, अनेक नागरिकांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. लॉकडाऊनमुळे अनेकांचे उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले होते ते गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू झाले. कर भरण्यासाठी पैसे जमा केले जात आहेत. त्यामुळे अशा मिळकतधारकांसाठी या योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवक तसेच नागरिकांकडूनही होत होती. त्यानुसार, या प्रस्तावास मान्यता दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, या प्रस्तावास शिवसेनेकडून स्थायी समितीच्या बैठकीत विरोध नोंदवला आहे.