नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री असणारे फारूक आणि ओमर अब्दुल्ला हे पिता-पुत्र तसेच मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून देशद्रोही वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या सहभागावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. पेशाने वकील असणाऱ्या संजीव कुमार यांनी संबंधित याचिका सादर केली आहे. अब्दुल्ला पिता-पुत्र आणि मेहबुबांची देशद्रोही आणि जातीयवादी वक्तव्ये घटनाविरोधी आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडणुकीतील सहभागावर बंदी आणावी. तसेच, त्यांच्या लोकसभेतील प्रवेशावर अटी लादण्यात याव्यात, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. संबंधित नेत्यांचा निवडणुकीतील सहभाग लोकशाहीची थट्टा ठरेल, असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला आहे.