कोची : मेजर अब्दूल रहीम हे अफगाण लष्करातील जवान काबूलमध्ये 19 फेब्रुवारीला मरण पावले. मात्र त्यामुळे तेथून कोसो मिटर दूर अंतरावर केरळमध्ये एका कुटुंबात असवांचा बांध फुटला. त्यांनी आपला मैत्रीचा “हात’ गमावला.
इलूर येथील टी. जी. जोसेफ यांचा हात या मेजरना 2015 मध्ये बसवण्यात आला होता. त्यानंतर जोसेफ यांच्या कुटुंबियांशी त्यांचं जणू नातं जोडलं गेलं. मेजर अब्दूल रहीम या बॉम्ब निकामी करणाऱ्या तज्ज्ञाचे हात 2012 मध्ये बॉम्बस्फोटात गेले. आपल्या अपंगात्वावर मात करण्यासाठी ते तीन वर्ष झगडत होते. त्यावेळी 54 वर्षीय जोसेफ यांचे अपघाती निधन झाले. त्यांचे हात या मेजरला देण्याचा निर्णय झाला.
डॉ. सुब्रह्मण्यम अय्यर यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने कोचीतील अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये शस्त्रक्रिया करून मेजरना हात जोडला. या शस्त्रक्रियेनंतर काही काळ फिजिओथेरपी केल्यानंतर मेजर रहीम यांचा हात कार्यरत झाला. त्यानंतर त्यांनी लष्करातील आपली सेवा पुन्हा सुरू केली. तीच सेवा बजावत असताना त्यांनी आता आपले प्राण गमावले.
त्यानंतर आपले अपंगत्व दूर करणाऱ्या जोसेफ यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी दरवर्षी ते कोचीला येत असत. जोसेफ यांच्या पत्नी म्हणाल्या, मेजर अब्दूल रहीम यांच्या मृत्यूने आम्हाला तीव्र धक्का बसला आहे. जोसेफ जरी आमच्यातून गेले असले तरी त्यांच्या अंशाच्या रूपाने ते भेटत असत. अब्दूल रहीम नेहमीच आमच्या आठवणीत रहतील. ते अमृता इन्स्टिट्यूटमध्ये येत त्यावेळी आम्ही त्यांना भेटत असू.
अमृता इन्स्टिट्यूटमध्ये हात प्रत्यारोपणाची ती पहिली शस्त्रक्रिया होती. त्यानंतर तपासणीसाठी ते नियमित येत असत. टी आर मानू यांचे ते खास मित्र बनले होते.