नवी दिल्ली – अफगाणिस्तानच्या राजदूतांच्या मुलीचे इस्लामाबादमध्ये झालेले अपहरण हा प्रकार धक्कादायक आहे. तसेच ही घटना झालेली नसल्याचा दावा करत पाकिस्तानने पुन्हा एकदा स्वतःची खालची पातळी दाखवून दिली आहे, अशा शब्दांत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पाकिस्तानला सुनाविले.
अरिंदम बागची म्हणाले, अफगाणिस्तानचे राजदूत नजिबुल्ला अलिखिल यांच्या 26 वर्षीय मुलीचे अज्ञातांनी शुक्रवारी इस्लामाबादमध्ये अपहरण करून तिला अनेक तास ओलीस ठेवले होते. ही अतिशय धक्कादायक घटना आहे.
हे प्रकरण अफगाणिस्तान व पाकिस्तानशी संबंधित आहे. तथापि, पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्र्यांनी भारताला यात ओढल्यामुळे, पाकिस्तानने संबंधित तरुणीचे म्हणणेच नाकारून नवी खालची पातळी गाठली आहे. एवढेच मी म्हणू शकेल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अलिखिलचे अपहरण करण्यात आलेले नाही. या पोलिसांच्या दाव्याचा पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद यांनी पुनरुच्चार केला.