मंडलाधिकारी, तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी ; महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
जामखेड – पकडलेला वाळुचा ट्रक जामखेड तहसील कार्यालयात जप्त करण्यासाठी नेत असताना वाळू तस्करांनी ट्रकसह मंडलाधिकाऱ्याचेच अपहरण केले. यानंतर मंडलाधिकारी व तहसीलदारांना दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच महसूल विभागाने कारवाईसाठी वापरलेल्या खासगी वाहनावर हल्ला करून गाडीच्या काचा फोडल्या. दुसऱ्या दिवशी संतप्त झालेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावुन कामबंद आंदोलन केले. या प्रकरणी आरोपी सुनिल किसन आजबे, (रा.जमदारवाडी ता.जामखेड) व पोपट दिलीप हळनावर (रा. जांबवाडी रोड जामखेड) यांच्यासह इतर दोन अशा एकुण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती अशी की, जामखेड महसूल विभागाच्या पथकातील तहसीलदार विशाल नाईकवाडे, मंडल अधिकारी सुखदेव कारंडे, तलाठी शिवाजी हजारे या चार जणांचे पथक जामखेड अरणगाव रस्त्यावर गस्त घालत होते. याच दरम्यान अरणगाव ते खडकत रस्त्यावर अवैध गौण खनिज वाहतूक करणारा वाळूचा हायवा ट्रक जामखेडकडे येत होता. यावेळी या पथकाने हा ट्रक अडवुन ताब्यात घेतला व जप्त करुन आरोपी सुनील किसन आजबे याच्यासह हा ट्रक तहसील कार्यालयात घेऊन येत असताना ट्रक मालक पोपट दिलीप हळणावर याने पाठीमागून येवून ट्रकला चारचाकी आडवी लावली. यानंतर मंडलाधिकाऱ्यांना ट्रक सोडुन देण्यास सांगितले. मात्र त्यांनी ट्रक सोडण्यास नकार दिला. यावेळी ट्रक मालक व चालकांनी ट्रक तहसीलमध्ये न नेता तो मंडलाधिकारी नंदकुमार गव्हाणे यांच्यासह ट्रक पळवून नेला.
यावेळी चालक, मालकाने ट्रकमधील वाळू रस्त्यातच खाली केली. यानंतर हा ट्रक मंडलाधिकारी गव्हाणे यांना घेऊन बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील जामगाव रस्त्यावरील हद्दीत नेण्यात आला. या घटनेची माहिती जामखेडचे पथक प्रमुख तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी तातडीने जामखेड व आष्टी पोलिसांना दिली. पळविलेल्या ट्रकचा जामखेड पोलिसांनी पाठलाग करुन आष्टी तालुक्यातील हद्दीत हा ट्रक पकडला व ट्रकमधून मंडलाधिकारी गव्हाणे यांची सुटका केली. जामखेड पोलिसांनी ट्रक शुक्रवारी पहाटे जप्त करुन पोलीस ठाण्यात आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक पोपट दिलीप हळनावर यास ताब्यात घेतले आहे तर इतर तीन आरोपी फरार आहेत.
दरम्यान शुक्रवार पहाटे वाळु तस्करांविरोधात कारवाई करण्यासाठी वापरण्यात आलेली चार चाकी खासगी वाहन हे तलाठी शिवाजी हजारे यांनी ते रहात असलेल्या आपल्या जामखेड खर्डा रस्त्यावरील बोराटे वस्ती या ठिकाणी लावण्यात आले होते. याच वाहनावर इतर आरोपींनी वाळुच्या ट्रकवर कारवाईचा राग मनात धरून या चारचाकी वाहनाची मोडतोड करून गाडीच्या काचा फोडल्या व घटनास्थळाहुन फरार झाले. दरम्यान वाळू तस्कारांच्या दहशतीने जामखेड शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात सरकारी कामात अडथळा व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील हे करत आहेत.