संस्कारक्षम मन घडविणारे आबा 

माझे वडील महसूलमंत्री बाळासाहेब भाऊसाहेब थोरात 62 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या बासष्टीच्यानिमित्ताने त्यांना प्रगतिपथावर जाण्याकरिता उदंड आयुष्य लाभावे, यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा !

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात माझे वडील असले तरी सार्वजनिक जीवनात ते माझे गुरू असून, एक दिशादर्शकही आहेत. माझ्या व्यक्तिगत जीवनाचा ते आधारस्तंभ आहेत. आम्ही सर्वांचे ते आबा आहेत. माझे आजोबा स्वातंत्रसैनिक स्व. भाऊसाहेब थोरात व आजी मथुराबाई यांनी आबांवर जे संस्कार केले, जी शिकवण दिली, तेच संस्कार आबांनी आम्हा भावंडावर केले. माझे आजोबा खरोखरच खूप धन्य आहेत, की त्यांनी त्याकाळी आबांना जनसेवेचा मंत्र दिला. विनम्र स्वभाव, प्रसन्न मद्रा, दुसऱ्याचा आदरभाव करणे, सर्वांना समानतेने वागविणे, अशा अनेक गुणांनी युक्त त्यांना एक आदर्श व्यक्तीमत्व बनवलंय.

माझ्यासाठी थोरात कुटुंबामध्ये जन्माला येणे, तेही बाबांची नात होण्याचे व आबांची मुलगी होण्याचे भाग्य मला मिळाले, ही खरोखरच पूर्वजन्माची पुण्याई आहे. मोठी ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक परंपरा असणाऱ्या कुटुंबामध्ये जन्माला येऊन साधेपणा जपणे तेवढे सोपे नाही. परंतु बाबांच्या व आबांच्या संस्कारांनी आम्हाला तो साधेपणा शिकविला. आम्हा भावंडांत शुद्ध विचार व संस्कार घडविण्यासाठी आबा खूप दक्ष होते. मला अजूनही वसतिगृहातील दिवस आठवतात. मी प्रवरानगरच्या प्रवरा विद्या कन्यामंदिर या शाळेत के. जी.च्या वर्गात असताना आबा मोटारसायकलवर मला भेटण्यासाठी लोणीला आले.

माझ्यासाठी लाल रंगाच्या बांगड्या व बिस्किटचे पुडे आणले होते. तो क्षण खरोखरच अविस्मरणीय आहे. अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या वसतिगृहामध्ये आम्ही तिन्ही बहिणी मी, सविता आणि जया शिकत असताना आबा नेहमी आम्हाला भेटायला यायचे. वसतिगृहाचे नियम त्यांनी कधीही मोडले नाही. स्वतःचे वेगळेपण त्यांनी कधीही दाखविले नाही. कर्तव्यदक्ष वडील म्हणून त्यांची भूमिका ते आजही योग्य रितीने पार पाडतात. राजकारणात यशस्वी होतांना कुटुंबातील भावनिक नातेसंवध जपण्याचा ते कायम प्रयत्न करतात.

कळत न कळत केलेल्या संस्कारांचे बालपणी फारसे महत्त्व वाटले नाही. परंतु आज क्षणोक्षणी त्यांचे संस्कार किती प्रभावी आहेत, याची जाणीव होते. प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीची आबा आम्हाला जाणीव करुन देत असतात. घरी आलेला प्रत्येकजण मग तो पाहुणा असो वा कार्यकर्ता चहा, जेवण घेतल्याशिवाय जाऊ नये, अशी शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे. त्याचा उपयोग आजही सासरी वावरताना होत आहे. बाबा आणि आबा यांनी कधीही मंदिरात देव शोधण्याचा प्रयत्न केला नाही. ते मानसातच देव मानतात व मानसाचीच सेवा करतात.

आज अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेत काम करित असताना एखादे काम जेव्हा त्यांच्याकडे घेऊन जाते, तेव्हा ते काम करताना तेथील प्राचार्य, व्यवस्थापनाचे अधिकारी या सगळ्यांशी चर्चा करुनच निर्णय घेतात.केवळ माझ्या एकटीवर कधीच विश्‍वास टाकत नाहीत. राजकारण, समाजकारण करीत असताना त्यांची प्रचंड धावपळ असते.कामाचा व्याप असतो. तरीसुद्धा आबा सकाळी जेवढे उत्साही असतात, तेवढेच उत्साही ते दिवसभर असतात. त्यांना यशस्वी होण्यासाठी माझी आई म्हणजे जिजी कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते.

आबा बाहेर असताना घरचा कारभार ती सक्षमपणे सांभाळते.ते राज्यासाठी ते एक कतृत्ववान नेता असले, तरी माझ्यासाठी एक सहृदय पिता आहेत. मला जर पुनर्जन्म मिळाला, तर पुन्हा त्यांचीच मुलगी म्हणून मिळावा, हेच परमेश्‍वराकडे माझे मागणे आहे. आबांचा उत्तरोत्तर उत्कर्ष होवो, त्यांच्या हातून समाजाची अखंड सेवा घडो, त्यासाठी त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभो, हीच त्यांच्या एकसष्टीनिमित्ताने मी प्रभूचरणी प्रार्थना करते.
– शब्दांकन अमोल मतकर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.