एकूण 8 पोलची खरेदी : विद्यापीठ चौकातून काढणार
पुणे – शहरात आठ ठिकाणी लावलेल्या त्या डेकोरेटिव्ह विजेच्या एका पोलची किंमत जवळपास 25 लाख रुपये असून, असे एकूण 8 पोल महापालिकेने लावले आहेत. यांची किंमत 1 कोटी 96 लाख रुपये असून, त्यातील 70 टक्के रक्कम महापालिकेने ठेकेदाराला आधीच दिली आहे.
विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडला जात असतानाही ठेकेदाराने तेथे दोन दिवसांपूर्वी डेकोरेटिव्ह पोल उभारला आहे. याविषयीची बातमी मंगळवारी (दि.27) दैनिक “प्रभात’ ने दिली होती. यावर तो पोल काढण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला विद्युत विभागाने दिले आहेत. परंतु, असे डेकोरेटिव्ह पोल शहरात आणखी सात ठिकाणी लावण्यात आले आहेत.
ही 1 कोटी 96 लाख रुपयांची निविदा “द्वारका कास्टिंग अँड इंजिनिअरिंग’ या कंपनीला तीन वर्षांपूर्वी देण्यात आली होती. त्यांनी आता हे पोल उभारण्यास सुरूवात केली असून, महापालिकेकडे अंतिम बिल अदा करण्यासाठी त्यांनी वेगाने हे काम सुरुवात केले आणि दिसेल तेथे हे पोल उभारले.
त्यातील शेवटचा पोल कोठे बसवावा, हा प्रश्न ठेकेदाराला पडल्याने त्यांनी जागेचा शोध घेतला. शेवटी विद्यापीठ चौकात पाषाण रस्ता-बाणेर रस्त्याच्या मधल्या भागात तो पोल दोन दिवसांपूर्वी उभारला. मात्र, येथे उड्डाणपुलाचे पाडकाम सुरू असल्याने तेथेच हा पोल उभारल्याचा “करिष्मा’ ठेकेदाराने केला.
येथे उभारले पोल
टिळक चौक (अलका टॉकिज), रेल्वे स्थानक, डेक्कन बसस्टॉप चौक, कात्रज येथे बीआरटी, सारसबाग, ओंकारेश्वर मंदिर चौक, खराडी इव्हॉन आयटी पार्क, विद्यापीठ चौक येथे हे पोल बसवण्यात आले आहेत.
याची उत्तरे कोण देणार?
– करारानुसार या पोलची देखभाल-दुरुस्ती तीन वर्षे ठेकेदाराने करायची आहे. आता विद्यापीठ चौकातील पोल पुन्हा बसवेपर्यंत आणखी किती काळ जाणार आहे, हे सांगणे शक्य नाही. त्यामुळे या मुदतीचे काय होणार?
– झटपट बिले सबमिट करून पैसे घेण्याच्या हिशेबाने हे काम करण्यात आल्याचे दिसून येते. आता विद्यापीठ चौकातील पोलही काढून घेण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित कंपनीला बिल देण्यात येणार आहे का?
पोल उभारणीच्या कामाचे पैसे आता अदा करण्याचा प्रश्न येत नाही. हे काम पूर्ण झालेले नाही. विद्यापीठ चौकातील पोल पुन्हा लावल्यानंतर हे काम पूर्ण झाले, असे म्हणावे लागेल.
– श्रीनिवास कंदूल, विद्युत विभागाचे प्रमुख, मनपा