आकर्षक रोषणाईने नटलेली शहरे, गगनचुंबी इमारती अन् लक्झरी गाड्या म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर दुबईचं नाव आलं नाही तर नवलच. अनेकदा आपण दुबईच्या शेखांच्या श्रीमंतीचे किस्से अचंबित होऊन ऐकत असतो. असाच अचंबित करणारा आणखी एक किस्सा दुबईमध्ये घडला असून त्याची चर्चा चौफेर सुरु आहे.
त्याचं झालं असं की, दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या मर्सिडीज-एएमजी जी 63 या एसयूव्ही कारवर काही पक्षांनी घरटं बांधलं. मुळातच निसर्गप्रेमी असलेल्या प्रिन्सना ही गोष्ट समजली. यानंतर प्रिन्स यांनी पक्षांना सुखाने राहता यावं यासाठी ती ३ कोटींची गाडी वापरणंच सोडून देण्याचा निर्णय घेतला!
फाझा नावाने प्रसिद्ध असणाऱ्या प्रिन्स यांनी मध्यंतरी आपल्या गाडीच्या बोनेटवर घरटं मांडलेल्या या पक्षांचा एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये या पक्षांनी एका पिलाला जन्म दिल्याचं दिसतंय. व्हिडिओमध्ये मादा पक्षी नुकतंच अंड्यातून बाहेर आलेल्या पिलाला दाणे भरवताना दिसत आहे.
विशेष म्हणजे प्रिन्स फाझा हे स्वतः या पक्षांची विशेष काळजी घेत असून कार लावलेल्या जागेत कोणीही जाऊ नये अशी ताकीदच त्यांनी देऊन ठेवलीये. पक्षांचा व्हिडीओ देखील त्यांना त्रास होणार नाही अशा अंतरावरून काढण्यात आल्याचं कळतंय.
१० कोटी फॉलोवर असलेले प्रिन्स फाझा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करताना, ‘कधीकधी छोट्या-छोट्या गोष्टीही मोठा आनंद देऊन जातात’ असा संदेश लिहला आहे.
View this post on Instagram