अबब! रुग्णवाढीचा दर 24 वरुन 28 टक्‍क्‍यांवर

दोन आठवड्यांपासून सक्रिय रुग्ण वाढले

पुणे – शहरातील रुग्णवाढीचा दर दिवसेंदिवस वाढत असून गेल्या काही दिवसात तो 24 टक्‍क्‍यांवरून 28 टक्‍क्‍यांवर गेला आहे. शहरासाठी ही बाब अतिशय चिंताजनक आहे. मात्र, पुढील आठवड्यापर्यंत ही वाढ कमी होण्याची शक्‍यता आहे. ती कमी न झाल्यास परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

करोनाचा आकडा दिवसागणिक फुगत आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण चांगले असले तरी बाधितांचेही प्रमाण वाढत आहे. दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत बाधित होणाऱ्यांचे दिवसाकाठी सरासरी प्रमाण साडेचौदा हजार होते. परंतु, या आठवड्यात हे प्रमाण सोळा ते साडेसोळा हजारांच्या घरात आले आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा दोन आठवड्यात एक हजारांची सरासरी वाढला आहे.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन बऱ्याच सवलती देण्यात आल्या. गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये रुग्णवाढीची टक्केवारी 24 ते 25 टक्के आहे. तेच प्रमाण या महिन्यामध्ये 27 ते 28 टक्‍क्‍यांवर पोहोचले आहे. रोजचा दोन हजार रुग्णवाढीचा दर कायम राहिला तर चिंता वाढण्याची लक्षणे आहेत. पालिकेकडून पोलिसांच्या मदतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आठवड्याभरात ही वाढ कमी होण्याची शक्‍यता असल्याचे आयुक्त कुमार यांनी सांगितले.

मास्क न घालणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. ही कारवाई आणखी तीब्र करण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वत:ची आणि इतरांची काळजी घ्यावी. प्रशासकीय यंत्रणा सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र काम करत आहे. नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे.
– विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.