पिंपरी -गणेशोत्सव नागरिकांनी साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले होते. मात्र, महापालिका प्रशासनाने स्वत: गणेशोत्सवासाठी सजविलेल्या रथांसाठी तब्बल 42 लाख 93 हजार रुपयांचा खर्च केला आहे. महापालिका ही खर्चाची रक्कम ठेकेदाराला अदा करणार आहे. सजावटीसाठी एकप्रकारे लाखो रुपयांची उधळपट्टीच करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
करोना प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका प्रशासनाने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा, असे आवाहन नागरिकांना केले होते. गणेश मूर्ती विसर्जनासाठी नदीपात्राजवळील घाट बंद ठेवण्यात आले होते. त्याऐवजी प्रभाग स्तरावर नागरिकांना गणेश मूर्ती विसर्जन करणे सोपे व्हावे, यासाठी फिरत्या रथांची व्यवस्था केली होती.
या रथांवर गणेशमूर्तींचे संकलन केले जात होते. संकलित केलेल्या गणेशमूर्तींचे खाणींमध्ये विधीवत विसर्जन करण्यात आले. गणेश मूर्ती विसर्जनासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास 10 विसर्जन रथ तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याशिवाय दीड दिवसांचा गणपती, तीन, पाच, सात, नऊ आणि दहाव्या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी हे रथ फुलांनी सजविण्यात आले होते.
शहरातील 8 क्षेत्रीय कार्यालयांसाठी एकूण 240 छोटे, मोठे विसर्जन रथ तयार केले होते. 40 हजार 400 फुलांच्या माळांनी हे रथ सजविले होते. त्यासाठी 42 लाख 93 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च झाला आहे. या खर्चास मंजुरी देण्याचा आणि त्यासाठी संबंधितांशी आवश्यक करारनामा करण्याचा प्रस्ताव नजीकच्या स्थायी समिती सभेसमोर मंजुरीसाठी आहे.
विशेष म्हणजे महापालिका उद्यान विभागासाठी हार, फुले, पुष्पगुच्छ, नारळ आदी पुरविण्याचे कामकाज संबंधित ठेकेदाराला 2017-18 मध्येच तीन वर्ष मुदतीसाठी दिलेले आहे. ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत होती. सप्टेंबर महिन्यातच गणेशोत्सव होता. त्यासाठी मूळ निविदेव्यतिरिक्त हा अतिरिक्त खर्च झालेला आहे.