दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स पुढील वर्षांपासून आरसीबी किंवा कोणत्याही संघाकडून क्रिकेट खेळणार नाही. कारण त्याला डोळ्यातील रेटिनाचा त्रास होत असल्याने त्याने शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले आहे. या शस्त्रक्रियेमुळे तो क्रिकेट खेळू शकणार नाही. सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधताना डिव्हिलियर्सने हा खुलासा केला आहे.
मी पुढच्या वर्षी चिन्नास्वामी स्टेडियमवर येईल असेही एबी डिव्हिलियर्सने सांगितले आहे. पण क्रिकेट खेळण्यासाठी नाही, तर आतापर्यंत आयपीएलचे जेतेपद न जिंकल्याबद्दल मी आरसीबीच्या चाहत्यांची माफी मागणार आहे. गेल्या दशकभरात त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मला त्यांचे आभार मानायचे आहेत. मी आता क्रिकेट खेळू शकत नाही. कारण माझ्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. असेही डिव्हिलियर्स म्हणाला.
याशिवाय डिव्हिलियर्सने हे देखील उघड केले की त्याला लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळण्याची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्याने ती नाकारली. तो म्हणाला की माझं आता खूप वय झालं आहे. लिजेंड्स लीगमध्ये खेळायला मजा आली असती. मात्र डोळ्याच्या शस्त्रक्रियेमुळे मी खेळू शकलो नाही. तो असेही म्हणाला की, मी नक्कीच एखाद्या संघाला कोचिंग देऊ इच्छितो आणि मी जे शिकलो ते देऊ इच्छितो. मी पुन्हा खेळणार नाही पण कोचिंग द्यायला मला आवडेल, असेही तो म्हणाला.
एबी डिव्हिलियर्सने २०१८ मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो वेगवेगळ्या स्पर्धात्मक लीग क्रिकेटमध्ये खेळत होता. तो शेवटपर्यंत आयपीएलमध्येही आरसीबी संघाकडून खेळला, पण आता त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटला रामराम ठोकला आहे. भारतासह जगभरात एबी डिव्हिलियर्सचे चाहते पाहायला मिळतात. तो असा खेळाडू आहे की ज्याचा कोणीही द्वेष करत नाही.