Mohalla Clinics to be renamed: दिल्लीमध्ये सत्तांतर झाले आहे. भाजपचा 27 वर्षांचा राजकीय दुष्काळ संपला असून, लवकरच पक्षाकडून सत्ता स्थापन केली जाणार आहे. मात्र, सत्तेत आल्यानंतर भाजपकडून आम आदमी पक्षाच्या (आप) अनेक योजना व कार्यक्रमांना कात्री लावली जाण्याची शक्यता आहे.
आपकडून ‘मोहल्ला क्लिनिक’ नावाने नागरिकांसाठी संपूर्ण दिल्लीत आरोग्यसंबंधित कार्यक्रम राबवला जात होता. ‘मोहल्ला क्लिनिक’ हे आपच्या प्रमुख कार्यक्रमांपैकी एक होते. नागरिकांकडून या सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभही घेतला जात होता. आता भाजपकडून सत्तेत आल्यानंतर या कार्यक्रमाचे नाव बदलले जाण्याची शक्यता आहे.
रिपोर्टनुसार, ‘मोहल्ला क्लिनिक’चे नाव बदलून ‘आरोग्य मंदिर’ केले जाण्याची शक्यता आहे. आयुष्मान भारत योजना लागू झाल्यानंतर मोहल्ला क्लिनिकचे नाव “आयुष्मान आरोग्य मंदिर” असे बदलले जाऊ शकते. आयुष्मान आरोग्य मंदिर हा कार्यक्रम आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे. यात मोफत प्राथमिक आरोग्यसेवा आणि विमा प्रदान केला जातो.
‘मोहल्ला क्लिनिक’च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने क्लिनिकची स्थिती तपासण्यासाठी अहवालही मागवला आहे. दिल्लीमध्ये आयुष्मान भारत योजना लागू करण्यावर आरोग्य मंत्रालयाचा भर असेल.
दरम्यान दिल्ली निवडणुकीआधी भाजपने जाहीरनाम्यात आयुष्मान योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता पक्षाकडून सत्तेत आल्यानंतर याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. या योजनेचा फायदा दिल्लीतील सुमारे 51 लाख नागरिकांना होण्याची शक्यता असून, त्यांना आयुष्मान कार्ड जारी केले जातील.