Harbhajan Singh: आम आदमी पार्टीच्या सात राज्यसभा खासदारांनी एकत्रितपणे भाजपमध्ये प्रवेश केल्याने देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या राजकीय भूकंपाचे पडसाद आता रस्त्यावर उमटू लागले असून, जालंधरमध्ये माजी क्रिकेटपटू आणि खासदार हरभजन सिंग यांच्या घराबाहेर ‘आप’ कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. संतप्त कार्यकर्त्यांनी हरभजन सिंग यांच्या घराच्या भिंतीवर आणि गेटवर ‘गद्दार’ असे लिहून आपला निषेध नोंदवला, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘आप’च्या गोटात चिंतेचे वातावरण – आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेल्या सात खासदारांमध्ये राघव चड्ढा, संदीप पाठक, स्वाति मालीवाल, हरभजन सिंग, राजिंदर गुप्ता, अशोक मित्तल आणि विक्रमजीत सिंह साहनी यांसारख्या दिग्गज नावांचा समावेश आहे. पक्षाच्या या बड्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ‘आप’च्या गोटात चिंतेचे वातावरण असून कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. जालंधरमधील हरभजन सिंग यांच्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने ही याच संतापाची अभिव्यक्ती मानली जात आहे. सर्व खासदारांचे सदस्यत्व अबाधित राहणार – या संपूर्ण घडामोडींवर भूमिका स्पष्ट करताना राघव चड्ढा यांनी सांगितले की, राज्यसभेतील ‘आप’च्या एकूण खासदारांपैकी सुमारे दोन-तृतीयांश खासदारांनी संविधानातील तरतुदींनुसार भाजपमध्ये विलीनीकरणाचा निर्णय घेतला आहे. या तांत्रिक निर्णयामुळे या सर्व खासदारांचे सदस्यत्व अबाधित राहणार आहे. चड्ढा यांनी यावेळी पक्षाच्या नेतृत्वावर गंभीर आरोप करताना म्हटले की, ज्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यासाठी पक्षाची स्थापना झाली होती, त्या मूळ तत्त्वापासून ‘आप’ आता भरकटली आहे, म्हणूनच त्यांना हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा राजकीय धक्का – अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. विशेषतः पंजाब आणि दिल्लीमध्ये पक्षाची ताकद टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आता त्यांच्यासमोर उभे राहिले आहे. राघव चड्ढा यांच्यासारखा तरुण आणि प्रभावी चेहरा पक्षापासून दूर जाणे हे ‘आप’साठी मोठे नुकसान आहे. दरम्यान, या फुटीनंतर पंजाबमध्ये पक्षाच्या अंतर्गत संघर्षाने उग्र रूप धारण केले असून, आगामी काळात याचे परिणाम राज्याच्या राजकारणावर मोठ्या प्रमाणावर दिसून येण्याची शक्यता आहे.