डॉ. हर्षवर्धन यांच्या मदतीला कपिल मिश्रा आणि राजकुमार चौहान
नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीचा सामना करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सज्ज झाला आहे. भाजपने उमेदवारांची निवड करण्यापासून ते निवडणुकीशी संबधित विविध कामांसाठी समित्यांची घोषणा केली आहे. ज्येष्ठ नेत्यांवर आगपाखड करणाया शाजिया इल्मी यांची मिडीया समितीचे सहप्रमुख बनवून बोळवण करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘धन्यवाद रॅली’नंतर भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या रंगात आला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होवू शकते. अशात, निवडणुकीच्या कामासाठी भाजपने वेगवेगळ्या समित्यांची घोषणा केली आहे.
दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी पक्षाच्या मुख्यालयात निवडणूक व्यवस्थापन समिती 2020 ची घोषणा केली. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या खांद्यावर घोषणापत्र बनविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे, याच समितीत आम आदमी पक्ष सोडून भाजपात आलेले कपिल मिश्रा आणि राजकुमार चौहान यांचाही समावेश करण्यात आला आहे. तरूण चुघ यांना संयोजक तर खासदार मिनाक्षी लेखी, सतीश उपाध्याय आणि राजीव यांना सहसंयोजक बनविण्यात आले आहे. क्रिकेटर आणि खासदार गौतम गंभीर आणि हंसराज हंस यांना विशेष संपर्क समितीचे प्रमुख बनविण्यात आले आहे.