नवी दिल्ली – अवघे दहा वर्षे राजकीय वय असणाऱ्या आपची ( AAP ) मुसंडी अचंबित करणारी आहे. त्या पक्षाने कॉंग्रेसला सत्तेतून हटवून आधी दिल्ली आणि नंतर पंजाब अशा दोन राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली. आता दिल्ली पालिका निवडणुकीच्या माध्यमातून आपने प्रथमच भाजपला सत्तेतून हटवण्याची किमया करून दाखवली आहे. भाजप आणि कॉंग्रेस हे देशातील दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष. त्या दोन्ही पक्षांना राजकीय मैदानात अस्मान दाखवण्याची कमाल आपने केली आहे.
यापुढे आपला गांभीर्याने घ्यावेच लागेल, असा संदेशच जणू दिल्ली निवडणुकीने इतर पक्षांना दिला आहे. दिल्ली पाठोपाठ गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. गुजरातची निवडणूक आपने ( AAP ) अतिशय ताकदीने लढवली आहे. त्या निवडणुकीतील चांगली कामगिरी राष्ट्रीय आकांक्षा बाळगणाऱ्या आपसाठी बुस्टर डोससारखी ठरू शकेल.
Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीच्या पराभवातही भाजपाला मोठा दिलासा
गुजरातमध्ये कॉंग्रेसला मागे सारून भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून आपने स्वत:ला प्रोजेक्ट केले. निकालात तसे प्रतिबिंब उमटल्यास आपचा उत्साह दुणावेल. एवढेच नव्हे तर, पुढील लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे नाव पुढे करण्याची मोहीमच हाती घेईल. गुजरातमध्ये अपेक्षित कामगिरी करू शकला नाही तरी त्या राज्यामुळे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याची मोठी संधी आपला उपलब्ध झाली आहे.
दिल्ली, पंजाब आणि गोवा या तीन राज्यांत आपला प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला आहे. आणखी एका राज्यात तो मिळाल्यास आप राष्ट्रीय पक्ष बनेल. त्यासाठी गुजरातमध्ये आपला केवळ विधानसभेच्या दोन जागा आणि सहा टक्के मते मिळवणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पक्ष बनल्यानंतर देशभरात विस्तारण्याच्या आपच्या आकांक्षांना आणखीच बळ मिळेल.