नवी दिल्ली – केंद्रीय अन्वेषण विभागाचा (सीबीआय) निषेध करणारा ठराव मंगळवारी दिल्ली विधानसभेत मंजूर करण्यात आला. दिल्लीतील सत्तारूढ आपच्या आमदारांना सीबीआय निवडकपणे टार्गेट करत असल्याचा आरोप ठरावातून करण्यात आला.
मुकेश अहलावत आणि संजीव झा हे आपचे दोन आमदार सध्या सीबीआयच्या रडारवर आहेत. दिल्ली परिवहन महामंडळाशी संबंधित बदल्यांच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विधानसभेत सीबीआयचा निषेध करणारा ठराव मांडण्यात आला.
त्या ठरावावरील चर्चेवेळी आपच्या आमदारांनी सीबीआयबरोबरच भाजपवर टीकेची झोड उठवली. आपचे आमदार लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. मात्र, त्यांना निवडक पद्धतीने सीबीआयकडून टार्गेट केले जात आहे. संबंधित प्रकरणाची बातमी सीबीआयने आपच्या आमदारांना बदनाम करण्यासाठी पेरली.
त्यामागे आप सरकारच्या दिल्ली मॉडेलला बदनाम करण्याचा भाजपचा डाव आहे, असा त्या टीकेचा सूर होता. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार वाईट पायंडा पाडत आहे. तो पक्ष कायम सत्तेवर राहणार नाही. त्या पक्षालाही वाईट वागणूक मिळू शकते, असा इशाराही आपकडून देण्यात आला.