पणजी -आम आदमी पक्षाने (आप) पंजाबपाठोपाठ गोव्यातील मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही जाहीर केला. त्यानुसार, अमित पालेकर हे गोव्यातील आपचा चेहरा असतील.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी 46 वर्षीय पालेकर यांच्या नावाची घोषणा केली.
पेशाने वकील असणारे पालेकर नुकतेच आपमध्ये दाखल झाले. आपसाठी नवखे असूनही त्या पक्षाने पालेकर यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. गोव्यात लक्षणीय संख्या असणाऱ्या भंडारी समाजाचे ते सदस्य आहेत.
गोवा निवडणुकीत प्रामुख्याने भाजप आणि कॉंग्रेसमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, आप आणि तृणमूल कॉंग्रेस हे पक्षही ताकदीने लढण्यास सज्ज झाले आहेत. त्याशिवाय, इतर पक्षही रिंगणात आहेत. त्यामुळे यावेळी गोव्यात बहुरंगी लढत अपेक्षित आहे.
आपने मंगळवारीच पंजाबमधील मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्या राज्यात आपने खासदार भगवंत मान यांना चेहरा बनवले आहे. पंजाबमध्ये यावेळी आप सत्तारूढ कॉंग्रेसला जोरदार टक्कर देईल, असे चित्र आहे.