नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात शाहिनबागेतील आंदोलनाच्या ठिकाणी गोळीबार करणारा कपिल बैसला हा आम आदमी पक्षाचा सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. कपिल बैसला आणि त्याचे वडील 2019 च्या सुरुवातीला आपमध्ये सामील झाले, असे ते म्हणाले.
कपिल बैसला याचा मोबाइल फोन ताब्यात घेण्यात आला आहे. या मोबाईलम्धून त्याचा व्हॉट्सअप डेटा, तो आणि त्याचे वडील आम आदमी पार्टीत सामील झाले तेंव्हाचे फोटो मिळवले आहेत, असे गुन्हे शाखेचे डीसीपी राजेश देव यांनी सांगितले.
दरम्यान या गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर कपिल बैसला याला सुनावण्यात आलेल्या पोलीस कोठडीला आज दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली.
गोळीबाराची ही घटना मोठ्या कारस्थानाचा भाग असण्याची शक्यता आहे, असे दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने बैसला याची कोठडी दोन दिवसांनी वाढवली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी फक्त एक दिवस मिळाला आहे, असे सांगून पोलिसांनी बैसलाचा चार दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती.
घटनेची वेळ आणि ठिकाणावरून गोळीबार करण्याची घटना ही मोठ्या षडयंत्राचा भाग आहे, घटनेची वेळ आणि ठिकाण हे स्पष्टपणे दर्शविते. त्याचा पूर्ण तपास होणे आवश्यक आहे. बैसला हा व्हॉट्सऍपवर वेगवेगळ्या ग्रुपशी संलग्न आहे. या ग्रुपमधील सदस्यांशी त्याचे काय संबंध आहेत, याची चौकशी होणे आवश्यक आहे. तपासणीत असे आढळले आहे की त्याचे व्हॉट्सऍप अकाऊंट हेतुपुरस्सर डिलीट केले गेले होते. त्यामुळे यासंदर्भात व्यापक कारस्थान असण्याची शक्यता असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
बैसला याच्या मोबाईलमधील डिलीट केले गेलेले व्हॉट्सऍपचे खाते पुनर्प्राप्त केले गेले असून बहुतेक डेटा पुनर्प्राप्त केला आहे. मात्र वेळेच्या कमतरतेमुळे त्याचे विश्लेषण करता आले नाही, असेही पोलिसांनी सांगितले.