मुंबई : राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरु होणार आहे. दरम्यान, त्यापूर्वी विशेष अधिवेशनात काल आणि आज नव्या आमदारांनी आपल्या आमदारकीची आणि गोपनीयतेची शपथ घेतल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शिंदेसेनेचे नवनिर्वाचित आमदार आमश्या पाडवी यांनी देखील आपल्या आमदारकी आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
मात्र यावेळी आमश्या पाडवी यांना शपथ घेताना एकही शब्द वाचता न आल्याचे पाहायला मिळाले. त्यांना अध्यक्षांनी शपथ वाचून दाखवली त्यानंतर त्यांनी ती एक एक शब्द मागून म्हटली.आमश्या पाडवी हे मूळचे शिवसैनिक आहेत. शिवसेनेत गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत. शिवसेनेला नंदूरबार जिल्ह्यात उभं करण्याचे काम त्यांनी केले आहे. ते नंदूरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत.
त्यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ मध्ये आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण २०१९ च्या निवडणुकीत आमश्या पाडवी यांनी ८० हजार ७७७ मते घेतली होती. तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमश्या पाडवी (शिवसेना शिंदे) यांचा ४८०० मतांनी विजय झाला.