नवी दिल्ली : दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाची पुन्हा एकदा जादू चालली आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले आहे. यासोबतच दिल्ली महापालिकेवरील भाजपची दीड दशकाची सत्ता संपुष्टात येणार आहे. या निवडणुकीत मुख्य लढत आप, भाजप आणि काँग्रेसमध्येच होती. भाजप कडवी लढत देत आहे. तर काँग्रेसने मात्र पिछाडीवर आहे.
दिल्ली महापालिकेच्या 250 जागांसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. तर आज मतमोजणी पार पडत आहे. या निवडणुकीत 250 जागांसाठी एकूण 1349 उमेदवार मैदानात होते. दरम्यान, दिल्ली महापालिकेच्या 250 पैकी 209 जागांचे निकाल हाती आले आहेत. यात आम आदमी पक्षाला 111 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजप 91 जागांवर विजयी झाली आहे. काँग्रेसने 6 जागांवर विजय संपादन केला आहे. तर एका अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. आम आदमी पक्ष सध्या 21, भाजप 14, काँग्रेस 2 आणि अपक्ष 3, तर एमआयएम एका जागेवर आघाडीवर आहे.
भाजपने एमसीडी निवडणुकीत पसमांदा कार्ड खेळत चार पसमांदा मुस्लिमांना उमेदवारी दिली होती. यामध्ये तीन महिला होत्या. पसमांदा मुस्लीम हे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्टीने सर्वात मागासलेले समजले जातात. यामध्ये अन्सारी, कुरेशी, मन्सुरी, सिद्दीकी अशा 41 जातींचा समावेश आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपचा एकही मुस्लीम उमेदवार विजयी होताना दिसत नाहीत.
समोर आलेल्या कलांमध्ये बहुमत मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. दिल्लीमध्ये आपच्या कार्यालयाबाहेर सेलिब्रेशन सुरु आहे. तर मुंबईतही आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.