आम आदमी पक्षाला हादरा

माजी मंत्री आणि महिला विभाग प्रमुख भाजपमध्ये दाखल

नवी दिल्ली -दिल्लीतील सत्तारूढ आम आदमी पक्षाला (आप) शनिवारी आणखी एक राजकीय हादरा बसला. त्या पक्षाला रामराम ठोकत दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा आणि पक्षाच्या महिला विभाग प्रमुख रिचा पांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मिश्रा यांची मे 2017 मध्ये मंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी जाहीरपणे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकेचे सत्र आरंभले. त्याशिवाय, भाजप नेत्यांबरोबरचा त्यांचा संपर्कही वाढला. अलिकडेच त्यांना आमदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले. तेव्हापासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

अखेर मिश्रा यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपची वाट धरली. भाजप प्रवेशानंतर त्यांनी आप आणि केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. आपने तत्वांपासून आणि भ्रष्टाचारविरोधी भूमिकेपासून घूमजाव केले आहे. केजरीवाल आता शरद पवार, पी.चिदंबरम्‌ आणि कपिल सिब्बल या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात. काही वर्षांपूर्वी त्या नेत्यांच्या विरोधात आंदोलन करतानाच आपच्या समर्थकांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, असे ते म्हणाले. तर आप आता आम आदमीचा पक्ष राहिला नसून खास लोकांचा पक्ष बनला आहे, अशी टीका पांडे यांनी केली.

पुढील वर्षी दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे. अशातच आपमध्ये गळती सुरू झाल्याचे चित्र आहे. याआधी त्या पक्षाच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे वेगळी विचारसरणी आणि कार्यपद्धती घेऊन राजकीय मैदानात उडी घेतलेल्या आपलाही गळती, पक्षांतर, बंडखोरीची लागण झाल्याचे स्पष्ट होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×