नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच नवे सरकार स्थापन होईल. त्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची आस आम आदमी पक्ष (आप) बाळगून आहे. नॅशनल कॉन्फरन्स, कॉंग्रेसचा समावेश असणाऱ्या इंडिया आघाडीची विधानसभा निवडणुकीत सरशी झाली. त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपने जम्मू-काश्मीरमध्ये चंचूप्रवेश करत एकमेव जागा जिंकली. त्या पक्षाचे उमेदवार मेहराज मलिक डोडा मतदारसंघातून विजयी झाले.
जम्मू-काश्मीरात खाते उघडल्याने सुखावलेल्या आपने सरकार स्थापनेसाठी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर, आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी डोडाला भेट दिली. त्यांनी आपच्या पहिल्या आमदाराला निवडून दिल्याबद्दल डोडाच्या जनतेचे आभार मानले.
केवळ डोडाचीच नव्हे; तर संपूर्ण जम्मू-काश्मीरची सेवा करण्याची संधी मलिक यांना मिळावी, अशी अपेक्षा केजरीवाल यांनी व्यक्त केली. त्यातून मलिक यांना मंत्रिपद मिळावे, अशी सदिच्छा त्यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. त्यापाठोपाठ आपचे ज्येष्ठ नेते संजय सिंह यांनी सोमवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत ती अपेक्षा उघडपणे बोलून दाखवली. जम्मू-काश्मीरमधील नव्या सरकारमध्ये आपच्या आमदाराला स्थान मिळावे असे आवाहन आम्ही मित्रपक्षांना केले आहे, असे त्यांनी नमूद केले.