कोटी – आम आदमी पार्टीने केरळमध्ये आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी “ट्वेन्टी-20′ नावाच्या छोट्या प्रादेशिक पक्षाबरोबर आघाडी केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल ही घोषणा केली. केरळमधील मुख्य प्रवाहातील राजकीय पक्ष स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास उत्सुक नाहीत, असा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.
“ट्वेन्टी-20′ या पक्षाचा प्रवर्तक असलेल्या किटेक्स ग्रुपने आयोजित केलेल्या सभेदरम्यान केजरीवाल यांनी मुख्य प्रवाहातील पक्ष केवळ गुंडगिरी आणि दंगलग्रस्तांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला. दिल्लीतील आम आदमी पार्टीने आतापर्यंत दिल्लीतील 12 लाख युवकांना रोजगार दिल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले. आम आदमी पार्टी आणि “ट्वेन्टी-20′ पक्षाने मिळून केरळमध्ये लोककल्याण आघाडी (पीपल्स वेलफेअर अलायन्स) स्थापन केल्याची घोषणाही केली.
10 वर्षांपूर्वी केजरीवाल आणि “आप’ला कोणीही ओळखत नव्हते. मात्र आता आपने दिल्लीत तीनवेळा सरकार स्थापन केले आहे. पंजाबमध्येही पक्षाचे सरकार आहे. केरळमध्येही बदल घडवायचा आहे, असे केजरीवाल म्हणाले. आम आदमी पार्टीमध्ये श्रीमंत राजकारणी नाहीत. सर्वसामान्य लोक आहेत. म्हणूनच हा पक्ष प्रामाणिक आहे, असेही केजरीवाल म्हणाले.
केरळमधील सर्वच राजकीय पक्षांनी लोकांचा विश्वासघात केला आहे, असे ट्वेन्टी-20 चे अध्यक्ष साहू जॅकॉब म्हणाले. केरळमधील सार्वजनिक क्षेत्राततील उद्योग तोट्यामध्ये आहेत. केरळमधील 40 लाख युवक बेरोजगार असल्याचा आरोप त्यांनी केला.